सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरु आहे आणि सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद आहेत. तसेच सर्व प्रकारच्या शुटिंग्सना बंदी घालण्यात आली आहे. गेल्यावर्षी लादलेल्या राष्ट्रीय टाळेबंदीमुळे असंख्य लोकांना रोजगार गमवावा लागला. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे खूपच हाल झाले. त्यातील बरेचशे परप्रांतीय असल्याकारामुळे त्यांनी आपापल्या घरचा रस्ता पकडला. मनोरंजनसृष्टीलाही याचा फटका बसला. गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीमुळे निर्मात्यांनी कानाला खडा लावलाय व अनेक चित्रपटांची शुटिंग्स महाराष्ट्राबाहेर होत आहेत.
महाराष्ट्रात सुरु झालेल्या लॉकडाऊनवर पर्याय म्हणून टेलिव्हिजन मालिकांनीही महाराष्ट्राबाहेर शुटिंग्स करायला सुरुवात केली आहे. अनेक राज्येदेखील मनोरंजनसृष्टीला आपल्याकडे वाळविण्यासाठी अनेक आमिषे दाखवीत आहेत. या सर्व प्रकारांची माहिती मेघराज शहाजीराव राजेभोसले, अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, यांनी मुख्यमंत्रांच्या निदर्शनास आणण्यासाठी त्यांना एक पत्र लिहिले आहे. त्यातील मजकूर अनेक गोष्टींचा आढावा तर घेतोच परंतु महाराष्ट्रात शुटिंगसाठी परवानगीची अपेक्षाही ठेवतो. असे आहे ते पत्र.....
प्रति,
मा.उद्धवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
महोदय,
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आपण ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन घोषित केला. त्याअंतर्गत आपण सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला ब्रेक दिलात.
खरं तर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनता घरातच खिळवून ठेवण्याचे काम आपली मनोरंजन इंडस्ट्री करीत असते.
आपण हीच इंडस्ट्री बंद केलीत. विविध हिंदी चँनेलने आपली शूटिंग महाराष्ट्राबाहेर हलवली आहेत. मनोरंजन इंडस्ट्री आपल्याकडे यावी म्हणून अनेक राज्यांनी रेड कार्पेट अंथरली आहेत. आज लॉकडाऊनचा आधार घेवून महाराष्ट्राबाहेर शूटिंग व्यवस्थित व योग्य बजेटमध्ये पार पडली जावू लागली तर ही इंडस्ट्री महाराष्ट्राबाहेर जायला वेळ लागणार नाही. या इंडस्ट्रीवर अवलंबून असणारे महाराष्ट्रातील लाखो कलाकार, तंत्रज्ञ, कामगार बेकार होतील. काही हजार कोटींचा वार्षिक टर्नओव्हर असणाऱ्या या इंडस्ट्री मधून तसाच मोठा महसूल राज्य सरकारला मिळत असतो.
बॉलिवूड महाराष्ट्राबाहेर हलवण्याचे मोठे षडयंत्र असून आपण त्यापासून सावध राहाणे अत्यावश्यक आहे.
बॉलिवूड इंडस्ट्री ही महाराष्ट्राची शान आहे.
आपल्याला नम्र विनंती की, अधिकाधिक नियम लावून का होईना परंतु शूटिंगला परवानगी द्या. यामध्ये आम्ही पुढील प्रमाणे खबरदारी घेऊन शूटिंग पार पाडू.
१-अतिशय कमी युनिट मध्ये शूटिंग करणे.
२-बांधकाम क्षेत्राच्या धरतीवर ज्या ठिकाणी शूटिंग आहे त्याच ठिकाणी जास्तीत जास्त लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करु.
३-सँनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करून काटेकोर अंमलबजावणी करु.
४- कलाकार, तंत्रज्ञ, कामगार यांना कोविड टेस्ट कम्पलसरी करु.
५-सेटवर डॉक्टरांची उपलब्धता करून देवू.
६-खाण्यापिण्यासाठी पर्यावरण पूरक अशा वस्तूंचा वापर करू.
७-काळजी घेवूनही कोणी पॉझिटिव्ह आले तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवू किंवा होम क्वारंटाईन करु.
८-खाण्यापिण्याचे साहित्य बाहेरुन आणण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करु. त्यामुळे एकमेकांशी कमीत कमी संपर्क होईल.
९-सर्व टीमची ऑक्सिजन पातळी व टेंम्परेचर याची रोजचे रोज रोज नोंद घेवून रजिस्टर मेंटेन करु.
१०- सार्वजनिक ठिकाणी शूटिंग टाळण्यात येईल.
क्रुपया आपण आमच्या मागणीचा गांभीर्याने व सकारात्मक विचार करुन चित्रीकरण करण्यासाठी परवानगी द्यावी ही विनंती.
कळावे,
आपला स्नेहांकित,
मेघराज शहाजीराव राजेभोसले
अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ.
यातून काहीतरी निष्पन्न होईल अशी अपेक्षा मराठी चित्रपट निर्माते बाळगून आहेत.