मुंबई - सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू आहे. या निवडुकीचे सहा टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर, आज (१९ मे) सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी मतदान करण्याचे आवाहन केले. मात्र, फरहान अख्तरने निवडणुका पार पडल्यानंतर मतदान करण्याचे आवाहन केल्याने तो सोशल मीडियावर ट्रोल झाला.
फरहानने आज (१९ मे रोजी) सकाळी लोकसभा निवडणुकी संदर्भात ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्याने भोपाळच्या मतदारांना आज मतदान करण्यास सांगितले आहे. परंतु भोपाळ विभागाचे मतदान हे १२ मे रोजीच पार पडले होते. वास्तविकतेचा विचार न करता फरहानने भोपाळच्या मतदारांना मतदान करण्यास सांगितले. तसेच साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना मत न देण्याचे आवाहनही त्याने आपल्या ट्विटच्या माध्यमातून केले होते. यावरूनही त्याला ट्रोल करण्यात आले.
'फरहानला लोकसभा निवडणुकीचे किती महत्व आहे हे दिसते', 'फरहानचे डोके ठिकाणावर आहे का?', 'भोपाळचे मतदान झाले आहे', 'फरहान पहिले लोकसभा निवडणुकीच्या तारखा पाहा', अशा अनेक प्रतिक्रिया त्याच्या ट्विटनंतर आल्या होत्या.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्यानंतर फरहानने पुन्हा एक ट्विट करत सोशल मीडियावर उत्तर दिले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की 'मी एका तारखेचा चुकीचा उल्लेख केला तर माझा गळा पकडत आहात. मात्र, ज्याने इतिहासालाच चुकीचे मानले, त्याची गळाभेट घेत आहात'. (हमने तारीख गलत समझी तो गला पकड लिया, जिसने इतिहास गलत समझा उसे गले लगा रहे हो), असे ट्विट त्याने केले आहे.