श्रीराम लागू यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ या दिवशी झाला. डॉ. बाळकृष्ण चिंतामण लागू हे पिता तर सत्यभामा लागू या त्यांच्या माता आहेत. त्यांचे शिक्षण भावे हायस्कूल, फर्ग्युसन महाविद्यालय आणि बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थांतून झाले.
वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असताना श्रीराम लागू यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली व नंतर भालबा केळकर यांसारख्या समविचारी वरिष्ठ स्नेह्यांसमवेत पुरोगामी नाट्य संस्था सुरू केली. १९५० च्या दशकात त्यांनी कान नाक घसा यांच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले आणि पुण्यात ५ वर्षे काम केले ब नंतर कॅनडा आणि इंग्लंड येथे पुढील प्रशिक्षण घेतले. १९६० च्या दशकात पुणे आणि टाबोरा, टांझानिया येथे त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. भारतात असताना पुरोगामी नाट्यसंस्था, पुणे आणि रंगायन, मुंबई यांच्यामार्फत रंगमंचावरील कामही सुरू होते. शेवटी १९६९ मध्ये त्यांनी पूर्ण वेळ नाट्य अभिनेता म्हणून वसंत कानेटकर लिखित इथे ओशाळला मृत्यू या नाटकापासून काम करण्यास सुरुवात केली. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका केली. नंतर सिंहासन, पिंजरा, मुक्ता सारख्या अनेक चित्रपटांतून कामही केले. त्यांच्या पत्नी दीपा लागू या ख्यातनाम नाट्यअभिनेत्री आहेत.
श्रीराम लागू नास्तिक तर्कप्रणीत विचारांचे आहेत. सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी देवाच्या मूर्तीला दगड असे संबोधले होते. नंतर 'देवाला रिटायर करा' नावाच्या एका लेखात देव ही कल्पना निष्क्रिय झाली असल्याचे त्यांनी लिहिले होते.
ते महाराष्ट्रातील अंधविश्वास निर्मूलन समितीशी जोडलेले आहेत. देव हा सुद्धा एक अंधविश्वासासाच प्रकार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. ते विज्ञानवादी आणि समाजवादी आहेत. सुशिक्षित लोकसुद्धा नवस वगैरे करतात हे पाहून त्यांना वाईट वाटते. आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार असतो आणि आपले ध्येय साध्य करायचे आपल्याच हातात असते, असा विचार तरूण पिढीला डॉ. लागू नेहमी सांगत असतात. आपल्या देशातील अंधश्रद्धा गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे लवकर नाहीशी होणार नाही याची त्यांना चिंता वाटते. आता तर बुवाबाजीमुळे परमेश्वराचे बाजारीकरण झालेले आहे हे त्यांना स्पष्ट दिसते. देवाच्या नावाने व्यापार करणारे धूर्त लोक हे समाजाचे शत्रू आहेत हे ते स्पष्टपणे सांगतात.
डॉ. लागू यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. श्रीराम लागू यांचा तन्वीर नावाचा तरुण मुलगा मुंबईतील लोकल गाडीवर झोपडपट्टीतील मुलाने मारलेल्या दगडामुळे जखमी होऊन मरण पावला. त्याच्या स्मरणार्थ लागूंनी स्थापन केलेले रूपवेध प्रतिष्ठान (२०१३सालच्या विश्वस्त दीपा लागू) २००४सालापासून ज्येष्ठ रंगकर्मींना ’तन्वीर सन्मान’ हा पुरस्कार देते.
डॉ. लागू यांनी सुमारे १२५ हून अधिक हिंदी आणि मराठी चित्रपटात कैाम केले आहे. समकालिन सर्व मोठ्या कालाकारांसोबत त्यांनी भूममिका केल्या. रंगभूमीचे तर ते अनभिषक्त सम्राट होते. अग्निपंख , आकाश पेलताना, उध्वस्त धर्मशाळा , एकच प्याला , किरवंत, नटसम्राट, सूर्य पाहिलेला माणूस यासारख्या गाजलेल्या पन्नासहून अधिक नाटकात त्यांनी मुख्य भूमिका साकारल्या.
"लमाण" हे डॉ. श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशन यांनी सन २००४ मध्ये प्रकाशित केले आहे.
डॉ. श्रीराम लागू यांना दीर्घायुष्य लाभो ही ईटीव्ही भारतच्या वतीने वाढदिवसानिमित्य शुभेच्छा.