मुंबई - शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'जगदंब क्रिएशन्स'कडून ३ सिनेमांची घोषणा मुंबईत करण्यात आली. शिवप्रताप मालिकेअंतर्गत या ३ सिनेमांची निर्मिती करण्यात येणार आहे. 'शिवप्रताप वाघनखं', 'शिवप्रताप वचपा' आणि 'शिवप्रताप गरुडझेप', अशी या ३ सिनेमांची नावे आहेत. यातील पहिला सिनेमा पुढील वर्षी ६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येईल. यामध्ये अमोल कोल्हे स्वत: देखील अभिनय साकारणार आहेत.
जगदंब क्रिएशनस या बॅनरखाली डॉ. अमोल कोल्हे यांनी 'बंधमुक्त' हे नाटक, त्यानंतर 'जाणता राजा शिवछत्रपती' हे महानाट्य, त्यानंतर महाराजांवर आधारीत एक कार्यक्रम केला होता. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट मांडणारी 'स्वराज्यरक्षक संभाजी', या मालिकेची निर्मिती केली. ही मालिका मराठी टीव्हीवर सर्वात प्रदीर्घकाळ चाललेली मालिका ठरली. नुकतेच या मालिकेने ७०० भागांचा टप्पा पूर्ण केला.
हेही वाचा -'आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे', एकाच अंतरपाटात लागणार ४ लग्न
त्यानंतर त्यांनी सोनी मराठीवर 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेची निर्मिती केली. त्यानंतर आता ऐतिहासिक विषयावर आधारित ३ सिनेमांची मालिका बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हे तिन्ही सिनेमे दरवर्षी एक यानुसार प्रदर्शित करण्यात येतील.
याबाबत बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, खासदार म्हणून दिल्लीत गेल्यावर संसदेत भाषणाचा शेवट 'जय महाराष्ट्र, जय शिवराय' असा मी करत असे. त्यावर अनेक प्रांतातून आलेले खासदार मला ये 'जय शिवराय क्या है' असे विचारायचे. त्यावेळी मला माझ्या राजाबाबत इतर प्रांतातील लोकांना किती कमी ज्ञान आहे ते समजलं. म्हणजे आपले महाराज त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात मी कमी पडलो हे मला जाणवलं. त्यामुळे आता महाराज काय होते, ते त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी या तीन सिनेमांची निर्मिती करणार आहे. तसेच मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत हे सिनेमे बनवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. एवढ्यावरच न थांबता बाकीच्या जबाबदाऱ्या सांभाळून मी स्वतः त्यात कामही करणार असल्याचे त्याने स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -'दोन स्पेशल'च्या मंचावर उलगडणार प्रिया आणि उमेशची लव्हस्टोरी
या ३ सिनेमांच्या मालिकेतील पहिला सिनेमा स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे दिग्दर्शक कार्तिक केंढे करणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आलं. तसेच जगदंब क्रिएशन्स सोबत काम केलेले कलाकार या सिनेमात दिसणार असून हिंदीतील काही मोठी नावं देखील या सिनेमामध्ये काम करताना दिसतील असंही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा -जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला', 'या' अभिनेत्रीची असणार मुख्य भूमिका
सिनेमात नक्की काय..?
शिवप्रताप वाघनखं -
शिवाजी महाराजांचं स्वराज्य पुणे सुपे परगण्या पलीकडे ज्या घटनेमुळे पोहचलं ती घटना म्हणजे आदिलशहाचा सरदार अफझल खान याच्याशी दिलेला लढा आणि त्याचा केलेला निःपात. या घटनेनंतर महाराजांच्या स्वराज्यकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. याच घटनेवर आधारित 'शिवप्रताप वाघनखं' हा सिनेमा आधारित असेल.
शिवप्रताप वचपा -
आलमगीर औरंगजेबचा सख्खा मामा शाहिस्तेखानाने पुण्यात येऊन मराठ्यांच्या केलेल्या प्रचंड नुकसानीचा वचपा काढण्यासाठी महाराजांनी सुरतेची लूट करून ही नुकसान भरपाई करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आधारित असा 'शिवप्रताप वचपा' हा सिनेमा असेल.
शिवप्रताप गरुडझेप -
छत्रपती शिवाजी महाराज मिर्जाराजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार आग्रा येथे गेले. त्यानंतर मोठ्या शिताफीने औरंगजेबाच्या तावडीतून सुटका करून स्वराज्यात परतले. मात्र, ते नक्की कोणत्या मार्गाने आणि कोणत्या अडचणींचा सामना करत परतले यावर इतिहासकारांमध्ये दुमत आहे. त्यामुळे ४ लक्ष होनाची खंडणी आणि ३० किल्ले जाऊनही परत आल्यावर ते पुन्हा स्वराज्यात समाविष्ट करून त्यानंतर शिवराज्याभिषेक करेपर्यंत घेतलेली गरुडझेप या सिनेमात पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा -तैमुरच्या तिसऱ्या वाढदिवसाचं धमाकेदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ