हैदराबाद - बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार (98 वर्ष) यांना मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी दिली.
दिलीप कुमार यांना वाढत्या वयामुळे काही व्याधी जडल्या आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यातही त्यांना नियमित तपासणी आणि चाचण्यांसाठी दोन दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सायरा बानो यांनी दिली आहे.
दिलीप कुमार हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांना 'ट्रॅजेडी किंग' आणि 'द फर्स्ट खान' म्हणून देखील ओळखले जाते. दिलीप कुमार यांनी १९४४ मध्ये 'ज्वार भाटा' चित्रपटातून पदार्पण केले होते. 5 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे 65 चित्रपटांत काम केले. त्यांच्या नावावर 'अंदाज', 'बाबुल', 'दीदार', 'ऐन', 'दाग', 'देवदास', 'आझाद', 'नया दौर', 'मधुमती', 'कोहिनूर' आणि ''मुगल-ए-आजम' असे गाजलेले चित्रपट आहेत.
त्यांचा शेवटचा चित्रपट 1998मध्ये आलेला किला होता. दिलीप कुमार यांना 1994 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2015 मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.