बीड - 'बायको देता का बायको?' या मराठी चित्रपटाचे अभिनेते सुरेश ठाणगे, अभिनेत्री श्वेता कुलकर्णी आणि दिग्दर्शक धनंजय यमपुरे यांच्यावर शनिवारी (२२ फेब्रुवारी) आशा सिनेमा हॉल येथे अज्ञात १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बीड शहरात घडलेल्या या गंभीर प्रकरणाची दखल पोलीस अधीक्षक यांनी घ्यावी, अशी मागणी मारहाण झालेल्या कलाकारांनी केली आहे. हल्लेखोरांनी मारहाणीनंतर आशा सिनेमा हॉल परिसरात तोडफोड देखील केली आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शहरातील आशा सिनेमा हॉल मध्ये शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या शो साठी प्रेक्षकांसोबत धम्माल करण्यासाठी आले होते. मात्र, चित्रपट गृहाच्या बाहेर त्यांच्यावर अचानक अज्ञातांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश ठाणगे आणि निर्माते धनंजय यमपुरे जखमी झाले आहेत. हल्लेखोर फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.