मुंबई - संगीतक्षेत्रातील आघाडीचे संगीतकार ए. आर. रेहमान यांच्या गाण्यांनी आजवर नवनवे इतिहास निर्माण केले आहेत. आता त्यांनी निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्यांच्या निर्मितीखाली तयार होत असलेला '९९ साँग्स' हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती.
इहान भट्ट हा अभिनेता या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री मनीषा कोईरालादेखील या चित्रपटात झळकणार आहे. विश्वेश कृष्णमूर्ती या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.
![Ehan Bhat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3121042_ar.jpg)
संगीतक्षेत्रातील एक उत्तुंग नाव म्हणून ए.आर. रेहमान यांच्याकडे पाहिले जाते. तरुणाईसह सर्वच वर्गातील श्रोत्यांवर त्यांच्या गाण्यांची भूरळ पडते. बॉलिवूडसह इतरही सिनेसृष्टीत त्यांनी आजवर अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. आता त्यांनी निर्मितीक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. जीओ स्टुडिओसोबत त्यांनी हात मिळवला आहे.
हा चित्रपट एक प्रेमकथा असणार आहे. या चित्रपटाची कथादेखील ए. आर. रेहमान यांचीच आहे. हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २१ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.