मुंबई - बॉलिवूडचा 'सिंघम' म्हणून ओळखला जाणारा अजय देवगन 'दे दे प्यार दे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात त्याच्यासोबत तब्बु आणि रकुल प्रित या अभिनेत्री झळकल्या. या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अजय-तब्बु आणि रकुलची केमेस्ट्री प्रेक्षकांवर छाप पाडत आहे. अलिकडेच या चित्रपटाने कमाईत शंभर कोटीचा आकडा गाठला आहे.
'दे दे प्यार दे' चित्रपटाची जादु दोन आठवड्यानंतरही सिनेमागृहात कायम आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर ८६.७६ कोटींची कमाई केली आहे. तर विदेशातील बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने १५ कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाच्या शर्यतीत २४ मे रोजी विवेक ओबेरॉयचा 'पीएम नरेंद्र मोदी' आणि अर्जून कपूरचा 'इंडियाज मोस्ट वान्टेड' हे चित्रपट उतरले. मात्र, या दोन्हीही चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. 'दे दे प्यार दे' चित्रपटाला माऊथ पब्लिसीटीचाही फायदा होताना दिसत आहे.
भारतात तब्बल ३१०० स्क्रिन्सवर हा चित्रपट झळकला आहे. प्रेम, भावना, रोमान्सने भरलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.