मुंबई - छोट्या पडद्यावरील बऱ्याच कलाकारांनी आत्तापर्यंत सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. सध्या 'झी मराठी' वाहिनीवर लोकप्रिय ठरलेली 'अग्गबाई सासुबाई' या मालिकेतील एका कलाकाराची थेट 'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटात वर्णी लागली आहे.
'अग्गबाई सासुबाई' मालिकेत आसावरीच्या बबड्याची भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष पत्की हा आगामी 'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटात दिसणार आहे. 'शहीद भाई कोतवाल' यांच्या भूमिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
आशुतोष पत्की ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. वडिलांपेक्षा वेगळी वाट धरत त्यानं अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. आता शहीद भाई कोतवाल या चित्रपटातून त्याला पहिल्यांदाच ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा -नववर्षात फरहान अख्तरची नवी इनिंग, पाहा फोटो
कोण आहेत शहिद भाई कोतवाल
ब्रिटिशांविरुद्धच्या सशस्त्र लढ्यात वीरमरण पत्करलेले माथेरानचे भूमिपुत्र विठ्ठल लक्ष्मण उर्फ भाई कोतवाल यांची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या धाडसाला वंदन करणाऱ्या 'शहीद भाई कोतवाल' या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले आहे.
स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील, एकनाथ महादू देसले यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
हेही वाचा -आपल्या चाहत्यांसोबत विद्या बालने 'असा' साजरा केला वाढदिवस
या चित्रपटात आशुतोषसोबत अभिनेते अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव अभिनेत्री ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी निमकर आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.