गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळेच अनेक निर्माते, दिग्दर्शकांचा ऐतिहासिक चित्रपट बनविण्याकडे कल दिसतोय. 'पानिपत', ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ‘टीझर’ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र रिलीज झाला. या पहिल्या टीझरमध्ये संगीत जगतातले अनभिषिक्त सम्राट अजय अतुल यांच्या संगीताची हलकिशी लकेर आपल्याला या चित्रपटाचं गुपित कानात हलकेच सांगते आहे असे वाटून जाते.
भलेही महाराष्ट्र लॉकडाऊन मध्ये चालला असला तरी गुढी पाडव्याला नवीन गोष्ट सुरु करण्याची प्रथा पाळत अनेक चित्रपटांच्या अनेकविध प्रकारच्या घोषणा झाल्या हे सकारात्मकतेचे उदाहरण आहे. गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरु होणाऱ्या ‘हिंदू संवत्सराचा’ आणि मराठी नववर्षाचा पहिला दिवस. साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त. ‘चंद्रमुखी’ हा बहु-चर्चित आणि बिग-बजेट चित्रपट देखील त्याच पॉझिटिव्हिटीने वाटचाल करतोय.
‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचे पोस्टर निर्माते अक्षय बर्दापूरकर व त्यांचा भारतातील पहिला-वहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म – ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’ यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे ‘फ्लाईन्ग ड्रॅगन’ हे सह-निर्माते आहेत. ‘एबी आणि सीडी’, ‘गोष्ट एका पैठणीची’या चित्रपटांच्या पाठोपाठ आता ‘चंद्रमुखी’ सिनेमाच्या निर्मितीतही ‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘गोल्डन रेशो फिल्म्स’ निर्माते म्हणून एकत्र आहेत.या चित्रपटाची, पटकथा आणि संवाद आहेत चिन्मय मांडलेकर यांचे असून संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी आहे. अजय-अतुल चं अस्सल मातीतलं मराठमोळं संगीत आणि प्रसाद ओक चं दिग्दर्शन हे ‘चंद्रमुखी’ ची खासियत ठरणार आहे.
हेही वाचा - हिऱ्यांची अंगठी पाहून चाहत्यांनी मलाइकाला विचारले, ''अर्जुनसोबत एंगेजमेंट झाली का?''