मुंबई - एकता कपूरची नुकतीच प्रदर्शित झालेली एक्सएक्सएक्स अनसेन्सॉर 2 ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. भाजप आमदार टी राजा आणि यूट्यूबर हिंदूस्तानी भाऊ यांच्यापाठोपाठ आता संत आणि पुजाऱ्यांनीही या सीरिजवर आक्षेप नोंदवला आहे. या सीरिजमध्ये वादग्रस्त सीन दाखवल्याचा आरोप केला जात आहे.
या सीरिजमधील एका सीनमधून भारतीय लष्काराच्या सन्मानाला ठेच पोहोचत असून यातून सैनिकांचा अपमान केला गेला असल्याचे या सर्वांचे म्हणणे आहे. या सीरिजमधील एका सीनमध्ये एका आर्मी जवानाची बायको त्याच्या अनुपस्थितीत भारतीय लष्कराचा गणवेश आपल्या बॉयफ्रेंडला घालण्यासाठी देते. त्यानंतर हा युनिफॉर्म फाडून ती बॉयफ्रेंडसोबत बेडवर जाते.
सीरिजमधील या सीनला विरोध करत हरिद्वारचे संत म्हणाले, की यातून एकता कपूरची मानसिकता झळकते. सोबतच आपले प्रेक्षक वाढविण्यासाठी हे लोक कोणत्या पातळीवर जाऊ शकतात हे यातून दिसते. पुढे ते म्हणाले, या सीनमधून भारतीय सैनिकांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि हे सहन केले जाऊ शकत नाही.
यावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते जे.पी. बडोनी म्हणाले की, आधुनिकतेच्या नावाखाली घाणेरडा कंटेट प्रेक्षकांना दाखवला जात आहे. हे सर्व थांबवणे गरजेचे आहे अथवा हे समाजासाठी घातक ठरू शकते. यापूर्वीच हिंदूस्तानी भाऊने एकता आणि शोभा कपूर यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.