मुंबई - मल्याळी अभिनेत्री सरन्या शशी हिचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. एकीकडे तिचे चाहते सोशल मीडियावर सरन्याला श्रद्धांजली देत आहेत, तर दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनीही शोक व्यक्त केला आहे.
35 वर्षीय सरन्या बराच काळ ब्रेन ट्यूमरशी लढत होती. यादरम्यान तिच्यावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या होत्या. अशातच तिला कोरोना संसर्गही झाला, त्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली. प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार, कोविडच्या गुंतागुंतीमुळे सरन्याचा मृत्यु झाला.
मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली
सरन्या कन्नूर जिल्ह्यातली रहिवासी होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. ती केरळमधील एक लोकप्रिय टीव्ही कलाकार होती. असे म्हटले जाते की जेव्हा सरन्या आर्थिक संकटाचा सामना करत होती, तेव्हा तिचे मित्र आणि चाहत्यांनी तिच्या उपचारासाठी निधी जमा केला होता. चाहत्यांसह, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी अभिनेत्रीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
आर्थिक संकटाशी सरन्याचा मुकाबला
जेव्हा सरन्याला तिच्या ब्रेन ट्यूमरची माहिती मिळाली, ती आर्थिक संकटाचा सामना करत होती. तिने उद्योगातील अनेक लोकांची मदतही घेतली. सरन्या मल्याळम टीव्हीच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. तिच्या काही लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये 'मंथ्राकोडी' 'सीता' आणि 'हरिचंदनम' यांचा समावेश आहे. तिने 'छोटा मुंबई', 'बॉम्बे', 'चाको रंदमन' आणि 'थालप्पवु' सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकाही केल्या होत्या.
हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्रच्या घरी आली चिमुकली पाहुणी!