मुंबई - दिग्दर्शनाबरोबर अभिनयाची धुरा सांभाळत अभिनेत्री रुचिरा घोरमोरे हिने चित्रपटसृष्टीत चांगलेच नाव कमावले. रंगभूमीवर काम करत तिने 'पाणी पंचायत' सारख्या गाजलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. याशिवाय 'बोले चुडीया' या चित्रपटातही तिने काम केले. आता रुचिराने मराठी चित्रपटसृष्टीकडे पावले वळवली आहेत. ती 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटात अभिनेता मंगेश देसाईसह रुचीराची मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ती प्रिया नावाची भूमिका साकारत असून एका नामवंत अशा पवार डॉक्टरांच्या मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रिया डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करत असलेल्या अमितच्या म्हणजेच चित्रपटातला हुकमी एक्का मंगेश देसाईच्या प्रेमात पडते. दोघांच्या एकमेकांवर असलेल्या अतोनात प्रेमाला मात्र प्रियाच्या वडिलांचा म्हणजे पवार डॉक्टरांचा विरोध असतो. याच नकाराला होकारात मिळवण्यासाठी चित्रपटादरम्यान सुरू असलेली मजेशीर धडपड, तसेच प्रिया आणि अमितच्या लग्नाचे पुढे काय होते? त्यांना होकार मिळतो का? कसा मिळतो? या सर्वच पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्याकरिता 'वाजवूया बँड बाजा' हा चित्रपट पाहायलाच हवा असा आहे.
हेही वाचा -'विकून टाक' चित्रपटाची रिलीज डेट बदलली, आता 'या' दिवशी बहरणार मुकुंद - धनश्रीची लव्हस्टोरी
अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत राष्ट्रीय पुरस्कार विजेते लक्ष्मण एकनाथराव कागणे, अमोल कागणे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी लोटन पाटील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २० मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -शशांक केतकर 'गोष्ट एका पैठणीची' मध्ये दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत