बंगळुरू - कन्नड सिनेमासृष्टीतील अभिनेत्री आणि बिग बॉसच्या तिसऱ्या हंगामाची स्पर्धक जयश्री रमैयाने आत्महत्या केली आहे. जयश्रीने बंगळुरू येथील संध्या किरण वृद्धाश्रमात गळफास लावून घेत आत्महत्या केली. जयश्रीच्या आत्महत्येबाबत पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा - 'मास्टर-ब्लास्टर' सचिन तेंडुलकर पुन्हा ताडोबा दौऱ्यावर
जयश्री काही काळ मानसिक तणावात होती. बंगळुरूमधील संध्या किरण आश्रमात तिच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून या जगाचा निरोप घेण्याचे म्हटले होते. ''मी नैराश्यातून मुक्त होऊ शकत नाही आणि म्हणूनच मरणार आहे'', असे तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते. मात्र, त्यानंतर जयश्रीने ही पोस्ट काढून टाकली.
जयश्री रमैया एक प्रसिद्ध मॉडेल आणि नर्तक होती. २०१५ मध्ये बिग बॉस कन्नड रिअॅलिटी शोमध्ये ती सहभागी झाली होती. किचा सुदीपने या कार्यक्रमाचे होस्टिंग केले होते. उप्पू हुली खरा हा जयश्रीचा पहिला चित्रपट होता.