औरंगाबाद - मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी औरंगाबादमधील नाट्यगृहांच्या दुरवस्थेबाबत आपले मत व्यक्त केले. मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. महोत्सवाचे उद्घाटन अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते आणि अभिनेते शंतनू गंगणे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.
मकरंद अनासपुरे यांनी उद्घाटन प्रसंगी औरंगाबादच्या संत एकनाथ रंगमंदिर येथे सुरू केलेल्या प्रवासाची आठवण करून दिली. त्याकाळी ज्या रंगमंदिरात आम्ही घडलो त्याची दुरवस्था झाली आहे. नाट्यगृहाची अवस्था चांगली करा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा -निवेदक राजेश दामले यांना यंदाचा 'भाऊ मराठे स्मृती पुरस्कार' जाहीर
उद्घाटन प्रसंगी मकरंद अनासपुरे यांनी आपल्या खडतर प्रवासाचे गुपित उलगडले. कलाकारांनी आपली सामाजिक जाणीव जपली पाहिजे. आपल्या संवेदना त्याने हरवता कामा नये. आपली कला सादर करतानाच इतरांच्या कलेतून शिकत गेले पाहिजे, असं आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘युवा महोत्सव २०१९‘ हा २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या महोत्सवात १८५ महाविद्यालयातील २५०० कलावंतानी नावनोंदणी केली आहे. ३ दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अनेक कलांचं सादरीकरण केले जाणार आहे.
या महोत्सवात ३६ कला प्रकार विद्यापीठ परिसरातील ७ रंगमंचावर सादर केले जाणार आहेत. यामध्ये सृजनरंग - समृह गायन पाश्चात्य, समुह गायन भारतीय, लोक आदिवासी नृत्य, सुगम गायन पाश्चात्य, लोकवाद्यवृंद, लावणी, कव्वाली, लोकरंग भजन, पोवाडा, वासुदेव, भारुड, गोंधळ, नाटयरंग : शास्त्रीय नृत्य, एकांकिका, मुकअभिनय, प्रहसन, नादरंग : शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय गायन, सुगम गायन, भारतीय स्टेट लोकगीत, लोकनाटय, मिमिक्री, जलला, शब्दरंग, वादविवाद, काव्यवाचन, चित्रकला, व्यंगचित्रकला, पोस्टर, रांगोळी, कोलाज, स्पॉट फोटोग्राफी, मृदमुर्तीकला, शॉर्ट फिल्म, असे सादरीकरण केले जाणार आहे.
हेही वाचा -IFFI 2019: ईफ्फीच्या सुवर्ण महोत्सवात बिग बींनी व्यक्त केल्या भावना