मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आता आपल्या तपासाची व्याप्ती वाढवली आहे. याप्रकरणी सुशांतचे नोकर, मित्र, बहीण, मॅनेजर, पीआर टीम, अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती अशा 13 जणांची चौकशी अद्याप पूर्ण करण्यात आली आहे. या तपासाची व्याप्ती वाढवताना मुंबई पोलिसांनी यशराज फिल्म्ससोबत सुशांत सिंग राजपूत याने केलेल्या करारपत्राची प्रत मागितली होती. यशराज फिल्म्सच्यावतीने रविवारी ही प्रत पोलिसांकडे सुपूर्त करण्यात आली आहे.
सुशांतने यशराज फिम्ससोबत तीन सिनेमाचा करार केला होता. यातला मनीष शर्मा दिग्दर्शित 'शुद्ध देसी रोमान्स' हा त्याचा पहिला सिनेमा 2013 साली रिलीज झाला होता. तर, 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' हा दुसरा सिनेमा 2015 मध्ये रिलीज झाला होता. सुशांतचा तिसरा सिनेमा होता शेखर कपूर यांचा 'पानी' या सिनेमाची निर्मिती यशराज फिल्म्स करणार होते.
सुशांतने या सिनेमावर काम करायला सुरुवात केली होती. दरम्यान संजयलीला भन्साळी यांनी त्याला रामलीलासाठी विचारले, मात्र हा तीन सिनेमाचा करार मोडता येणे शक्य नसल्याने सुशांतने एकापाठोपाठ अनेक उत्तम सिनेमांना नकार दिला. दोन वर्षे या सिनेमाला देऊनही अखेर हा सिनेमा बनलाच नाही. त्यामुळे, त्याची मनस्थिती बिघडण्यामागे हा करार तर जबाबदार नाही ना, याचा तपास पोलीस करणार आहेत. या करारात अशा काय जाचक अटी नियम आहेत, त्याचीदेखील पोलीस शहानिशा करण्याची शक्यता आहे.
यशराज फिल्म्सचा तीन सिनेमाचा करार आहे तरी काय..?
यशराज फिल्म्स बॉलिवूडमधील प्रतिष्ठित बॅनर आहे. जेव्हा बॉलिवूडमध्ये मोजके बॅनर होते, तेव्हा कलाकार या मोठ्या बॅनरशी प्रामाणिक राहात असतं. मात्र, जसजसा काळ बदलला आणि अनेक छोटे मोठे बॅनर्स बॉलिवूडमध्ये निर्माण झाले तसे यशराजच्या सिनेमातून मोठे झालेले कलाकार यशराजलाच डेट्स जुळत नाहीत, वेळ नाही अशी कारण द्यायला लागले. त्यामुळे, कलाकारांनी जमिनीवर राहावं आणि मिळालेल्या स्टारडमचा गैरवापर करू नये यासाठी या तीन सिनेमा कंत्राटाचा जन्म झाला. यानुसार यशराजच्या सिनेमातून पदार्पण करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या कलाकाराला एकूण तीन सिनेमे यशराज फिल्म्ससोबतच करावे लागतील अशी अट घालण्यात आली.
हे कंत्राट केल्यापासून यशराजसोबतचा तिसरा सिनेमा रिलीज होईपर्यंत इतर कोणत्याही बॅनरच्या सिनेमात काम करता येणार नाही. या कराराचा भंग झाला तर सदर कलाकाराकडून कंत्राटाच्या रक्कमेच्या दहा पट रक्कम वसूल करायची मुभा निर्मात्याला असेल. यशराजच्या या कंत्राटानुसार रणवीर सिंगने 'बँड बाजा बारात', 'लेडीज वर्सेस रिकी बहल', आणि 'बेफिकरे', अनुष्का शर्माने 'बँड बाजा बारात', 'लेडीज वर्सेस रिकी बहल', 'बदमाश कंपनी' असे प्रत्येकी तीन सिनेमे केलेले आहेत. याच नियमानुसार सुशांत बांधला गेल्याने दोन सिनेमे करूनही तिसरा सिनेमा करत नाही तोपर्यंत तो इतर सिनेमे करू शकला नाही, अशी चर्चा आहे. 'पानी' तयार झालाच नाही आणि आदित्य चोप्राने 'बेफिकरे'मध्ये सुशांतऐवजी रणवीर सिंगला कास्ट केलं. त्यामुळे, हे कंत्राट संपण्याचा कालावधी विनाकारण वाढत गेला अशीही बॉलिवूडमध्ये चर्चा आहे.