मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी एक नवीन खुलासा समोर आलेला आहे. रिया चक्रवर्तीचा एक व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यामुळे रिया चक्रवर्ती आणि ड्रग्स डिलर यांच्यात संपर्क असल्याच्या गोष्टी समोर आल्या आहेत. हे चॅट तपास करणाऱ्या ईडी तपास यंत्रणेकडून सीबीआय व नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
सुशांतसिंह प्रकरणी तपास करत असलेल्या ईडीकडून रिया चक्रवर्ती हिच्या मोबाईलमधला व्हॉट्सअॅप चॅट डिटेल्स तपासले असता ही गोष्ट समोर आल्याचे सांगितले जात आहे. या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून रिया चक्रवर्ती ही अमली पदार्थांचे सेवन करत होती व त्याची खरेदी करत होती, असे समोर आले आहे. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये रिया चक्रवर्ती अमली पदार्थाबद्दल व्हॉट्सअॅप चॅटवरून विचारत आहे. मात्र, तिने मागणी केलेले अमली पदार्थ हे संपले असून यासाठी इतर ठिकाणी प्रयत्न करावे लागतील असे या चॅटमध्ये लिहिण्यात आले आहे.
दरम्यान, सुशांतसिंह याचा कुक नीरज सिंग याने या अगोदर मुंबई पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, सुशांतसिंहच्या घरी ज्या दिवशी पार्टी व्हायची त्या दिवशी सुशांतच्या घरात गांजाचे सेवन केले जात होते. स्वतः नीरज याने सुशांतला काही वेळा गांजाचा रोल बनवून दिल्याचेही त्याच्या जबानीत म्हटले आहे. मात्र, रिया चक्रवर्तीने तिच्या आयुष्यात कधीही अमली पदार्थांचे सेवन केले नव्हते व तिच्यावर लावण्यात आलेले अमली पदार्थांच्या संबंधातील आरोप हे बिनबुडाचे असल्याचे रियाचे वकील सतिश माने शिंदे यांनी स्पष्ट केले.