मुंबई - सुप्रसिद्ध संगितकार वाजिद खान यांचे मुंबईतील रुग्णालयात निधन झाल्याने खळबळ उडाली होती. त्यांच्या निधनानंतर उलटसुलट चर्चेला पेव फुटले होते. मात्र शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांनी एक पत्रक काढत त्यांच्या निधना बाबत स्पष्टीकरण दिले आहे. या पत्रकात वाजिद यांचे निधन हृदयविकाराने झाल्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे वाजिद यांच्या निधनाबाबत होणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे.
वाजिद यांच्या कुटुंबीयांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे, की आमच्या प्रिय वाजिदचे निधन १ जूनला वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराने झाले आहे. मागच्या वर्षी त्यांच्या किडणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या गळ्याच्या संक्रमणाचा उपचार सुरू होता.
या पत्रकात वाजिद यांच्या कुटुंबीयांनी डॉ. प्रिंस सुराणा यांचे आभार व्यक्त करुन त्यांनी आपल्या भावासारखीच वाजिदची काळजी घेतल्याचे नमूद केले आहे.