मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता किरण कुमार काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांचा कोरोना विषाणू चाचणीचा तिसरा अहवाल निगेटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. तथापि, त्यांचे कुटुंब अद्यापही सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे.
आपल्या प्रकृतीविषयी बोलताना किरण म्हणाले, "माझे कुटुंब अजूनही घरात क्वारंटाईनचे काटेकोर पालन करीत आहे. मला संसर्ग होण्याची कोणतीही चिन्हे नव्हती आणि क्वारंटाईन झाल्यामुळे कंटाळा येण्याशिवाय मला आणखी त्रास झाला नाही. नाईलाजाने आयसोलेट राहावे लागल्यामुळे मी त्याच्याकडे संधी म्हणून पाहिले. जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न आणि आत्मचिंतन करतोय.
किरण जेव्हा दोन आठवड्यांपूर्वी रूटीन तपासणीसाठी रूग्णालयात गेले होते तेव्हा कोरोना विषाणूचे निदान झाले होते. त्याच वेळी हॉस्पिटल व्यवस्थापनाने खबरदारी घेत इतर चाचण्यांसह त्याची कोरोना टेस्टही घेतली होती. किरण म्हणाले, "हिंदुजा खार आणि लीलावतीच्या सर्वोत्कृष्ट डॉक्टरांनी आम्हाला पुरेशी माहिती दिली ज्यामुळे भीती उद्भवणार नाही. आम्ही बीएमसीला आमच्या कोविड-१९ संबंधित परिस्थितीची जाणीव करून दिली आणि सर्वांनी जीवनसत्व पूरक आहार वाढविला आहे."
किरण कुमारच्या आधी बॉलिवूड अभिनेत्री झोया मोरानी आणि गायिका कनिका कपूर यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले होते. तथापि, दोघे आता पूर्णपणे निरोगी आहेत.