नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचे दोन ट्विट कंपनीने वेबसाईटवरुन काढून टाकले आहेत. नियमांचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे ट्विटर इंडियाने स्पष्ट केले आहे. कंगना गेल्या कित्येक दिवसांपासून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर आपल्या ट्विट्सच्या माध्यमातून टीका करत होती.
दोन ट्विट्स केले डिलीट..
यांपैकी एका ट्विटमध्ये कंगनाने "देशातून कॅन्सर समूळ नष्ट करायचा आहे", अशा आशयाचे वक्तव्य आंदोलकांबाबत केले होते. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये तिने "त्यांची मुंडकी उडवायची वेळ आली आहे" अशा आशयाचे वक्तव्य केले होते. या ट्विट्सना कित्येक ट्विटर वापरकर्त्यांनी आक्षेपार्ह असल्याचे रिपोर्ट केले होते. मंगळवारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलन समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर कंगनाने मोठ्या प्रमाणात आंदोलन विरोधी ट्विट करण्यास सुरुवात केली होती.
रिहानाच्या ट्विटनंतर सेलिब्रिटींचे ट्विटर वॉर..
कंगनाने केवळ रिहानाच नाही, तर दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नूवरही मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. यामध्ये तिने ज्या प्रकारची भाषा वापरली आहे, त्यावरुन तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते आहे. रिहानाच्या ट्विटनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्स "भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहोचू देऊ नका. देश आपल्या अंतर्गत बाबी सांभाळण्यासाठी सक्षम आहे, त्यामुळे बाहेरच्या लोकांनी त्यावर बोलू नये" अशा आशयाचे ट्विट करत आहेत. त्यावर तापसीने "कोणाच्या एका ट्विटमुळे जर तुमच्या सार्वभौमत्वाला तडा जात असेल, तर त्यांची तोंडे बंद करण्यापेक्षा आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे" अशा आशयाचे ट्विट केले होते.
ट्विटरने कंगनावर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या महिन्यात तांडव या अमेझॉन प्राईमवरील सीरीजबाबत ट्विट केल्यानंतर तिचे अकाऊंट काही काळासाठी बंद करण्यात आले होते.
हेही वाचा : मिशन आत्मनिर्भर! तेजस लढाऊ विमानांसह लष्करी सामुग्रीच्या निर्यातीस मंजुरी