मुंबई - मनोरंजनसृष्टीने खडतर २०२० बघितल्यानंतर हे वर्ष व्यावसायिकदृष्ट्या चांगले जाईल असे वाटत होते. वर्षाच्या सुरुवातीपासूनच सिनेमा-शूट्स आणि चित्रपट-प्रदर्शन यांची कॅलेंडर्स बनत होती. परंतु नियतीला वेगळेच मान्य होते. गेल्या काही आठवड्यांपासून कोव्हीड-१९ च्या केसेस मध्ये लक्षणीय वाढ झाली असून पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावं लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाईट कर्फ्यू तर सुरु झालाय आणि साहजिकच चित्रपटसृष्टीतील गतिविधींवर अंकुश लागला आहे. या परिस्थितीत चित्रपटगृहांमध्ये जाणे धोकादायक झाले असल्याकारणाने अनेकांना मजबुरीने चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलावे लागले. कोव्हीड-१९ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला बळी ठरला आहे ‘हाथी मेरे साथी’.
‘हाथी मेरे साथी’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले खरंतर हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता आणि यात महत्वपूर्ण भूमिका करणारी मराठमोळी श्रिया पिळगावकर त्याबद्दल खूप उत्साहित होती. परंतु या चित्रपटाचे प्रदर्शन दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्यामुळे ती नक्कीच खट्टू झालीय. यावर्षी ‘हाथी मेरे साथी’ २६ मार्च ला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता. या त्रैभाषिक चित्रपटात राणा डग्गुबाती, पुलकित सम्राट, श्रिया पिळगावकर आणि झोया हुसेन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘हाथी मेरे साथी’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले ‘आम्ही गेल्या वर्षभरापासून वाट पाहत आहोत पण परिस्थिती फारशी बदलली नाही. आम्हाला वाटलं की सर्व काही सामान्य स्थितीत परत येत आहे परंतु महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये अचानक झालेली वाढ चिंताजनक आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी 'हाथी मेरे साथी' ची हिंदी आवृत्तीचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. पुढची तारीख लवकरच कळवू’ असे इरॉस इंटरनॅशनलने कळविले होते. परंतु या चित्रपटाच्या तामिळ आणि तेलगू आवृत्ती अनुक्रमे ‘कादन’ आणि ‘अरण्य’ दक्षिण भारतात प्रदर्शित झालेत. वाढत चाललेला कोव्हीड धोका अजून किती चित्रपटांना ग्रासतो हे पुढे कळेलच.
हेही वाचा - 'वेल डन बेबी’: पाहा, पुष्कार जोग आणि अमृता खानवीलकरची संवेदनशील मुलाखत