मुंबई - अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी 'जवानी जानेमन' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अभिनेत्री तब्बूदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिनं चित्रपटातील आपला फर्स्ट लूक शेअर केला होता. आता तिनं सैफसोबत स्क्रीन शेअर करण्याबाबत आपलं मत मांडलं आहे.
तब्बूनं याआधीही 'तू चोर मैं सिपाही', 'हम साथ साथ हैं' आणि 'बीवी नंबर १' सारख्या चित्रपटांसाठी सैफसोबत काम केलं आहे. अशात आता इतक्या वर्षांनी सैफसोबत पुन्हा स्क्रीन शेअर करणं मजेशीर असल्याचं तब्बूनं म्हटलं आहे. यासोबतच सैफला विनोदाचं अचूक टायमिंग माहिती आहे. त्यामुळे, त्याच्यासोबत या नव्या सिनेमात काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं तिनं म्हटलं आहे.
दरम्यान जवानी जानेमन चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर करत आहेत. तर, सैफच्याच होम प्रोडक्शनमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. 'जवानी जानेमन' या चित्रपटात सैफ हा ४० वर्षीय वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर, त्याच्यासोबत अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवालाही झळकणार आहे. ती सैफच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.