पाटणा - बिहारच्या मुझफ्फरपूर न्यायालयात ज्येष्ठ वकील सुधीर ओझा यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्या वकिलांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला. तर काही आरोपींनी उत्तर दाखल केले आहे. न्यायालयाने करण जोहर आणि सलमान खान यांना जानेवरीच्या पहिल्या आठवड्यापूर्वी आपले उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
आदित्य चोपडा, साजिद नाडियाडवाला, संजय लीला भन्साळी, भूषण कुमार, एकता कपूर आणि दिनेश विजयान यांनी उत्तर दाखल केले आहे. सलमान खान आणि करण जोहर यांनी उत्तर दाखल केले नव्हते. गेल्या 17 जून 2020 ला आठ कलाकारांविरोधात वकील सुधीर ओझा यांनी मुझफ्फरपूर न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जानेवरीच्या पहिल्या आठवड्यामध्ये याप्रकरणी सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण -
सुशांतसिंह राजपूत हा 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान, निर्माती एकता कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि निर्माता करण जोहरसह आठ जणांविरोधात मुझफ्फरपूरच्या सीजेएम न्यायालयात खटला दाखल झाला होता. मात्र, मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर असल्याचे सांगून तक्रार फेटाळून लावली होती. त्यानंतर या निर्णयाला वकील सुधीर ओझा यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात आव्हान दिले होते.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: '2020' सरकारच्या योजनांचा आणि आरोग्याबाबत निर्णयांचा आढावा