मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनाने सर्वांनाच झटका बसला आहे. त्याने इतके मोठे पाऊल का उचलले हाच प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित होत आहे. त्याच्या आत्महत्येची चौकशी सुरू आहे. अद्यापही त्याचे ठोस कारण सापडलेले नाही. तो काही महिन्यापासून डिप्रेशनमध्ये होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते, इतकेच याबाबत सांगितले जात आहे.
सुशांतच्या निधनाने त्याचे वडील कोलमडून पडले आहेत. त्याचे वडील सोमवारी पटनाहून मुंबईला आले आणि सुशांतवर अंत्यसंस्कार केले. सुशांतच्या निधनानंतर आता त्यांचे म्हणणे पुढे आले आहे.
मुंबई पोलिसांनी सुशांतसिंहच्या वडिलांचे आणि त्याच्या दोन्ही बहिणींचे अधिकृत जवाब घेतले आहेत. कुटुंबीयांचा कोणावरही शंका नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुशांतला बरे वाटत नसल्याचे तो नेहमी सांगायाचा असे वडिलांनी सांगितले. तो डिप्रेशनमध्ये आहे आणि त्याच्यावर इलाज सुरू असल्याचे त्यांना माहिती नव्हते असेही त्यांनी सांगितले.
व्यवसायिक वैरत्वातून सुशांतने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला असेल का याचा शोध पोलीस घेत आहेत. सुशांतने हे पाऊल का उचलले याचे कोणतेही ठोस कारण सापडलेले नाही. त्याच्या खोलीतून सुसाईड नोट मिळालेली नव्हती.