मुंबई - सनी लिओनीने कोरिओग्राफर सरोज खान यांच्या स्मृतींना उजाळा दिलाय. सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
सनी लिओनी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून कोरिओग्राफर सरोज खान यांनी आपल्याला भारतीय लोकनृत्याचे धडे दिल्याचे सांगितले आहे. पोस्टसोबत सनीने सरोज यांच्यासोबतचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटोही शेअर केलाय. यात दोघी चर्चा करताना दिसतात.
सुंदर आणि संयमी गुरू, मला भारतीय लोकनृत्याचे प्राथमिक धडे शिकवत असताना माझी छोटी भेट झाली होती. ती भेट जरी छोटी असली तरी मी वारंवार हा व्हिडिओ पाहते, मी आजही त्या व्हिडिओतून नृत्य शिकते. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, असे सनी लिओनी यांनी म्हटले आहे. सनी यांनी सरोज खान यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्या दुःखात सहभागी असल्याचे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
हेही वाचा - बॉलिवूडमधील सर्वांच्या लाडक्या 'मास्टर जी' सरोज खान
सरोज खान यांना वांद्रे येथील रुग्णालयात श्वास घेण्याच्या आणि डायबेटीसच्या त्रासाबद्दल भरती करण्यात आले होते. त्यांना अनेक अजारांचा त्रास होता. मात्र त्यांची कोरोनाची टेस्ट नेगिटिव्ह आली होती. आज पहाटे त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
हिंदी सिनेमाच्या ज्येष्ठ कोरिओग्राफर म्हणून त्यांचे नाव सुपरिचीत आहे. बॉलिवूडमध्ये त्यांना सर्वजण 'मास्टरजी' म्हणून ओळखत असत. त्यांनी सुमारे २००० गाण्यांची कोरिओग्राफी केली. यापैकी माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीत झालेले 'एक दोन तीन' आणि 'धक धक करने लगा' ही गाणी आणि श्रीदेवी यांच्यावर चित्रीत झालेली 'हवा हवाई', 'मैं नागिन तू सपेरा' ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती.