चेन्नई - ज्येष्ठ पार्श्वगायक एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती, अशी माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
५ ऑगस्ट रोजी एस.पी. बालसुब्रह्मण्यम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७४ वर्षीय गायक इन्टेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) मध्ये असून तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार घेत आहेत, असे एमजीएम हेल्थकेअरने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
एमजीएम हेल्थकेअरच्या सहाय्यक संचालक वैद्यकीय सेवा संचालक डॉ. अनुराधा बसकरन यांनी सांगितले की, "१३ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा झालेल्या तपासणी निष्कर्षात तिरु (श्री) एस पी बालसुब्रह्मण्यम यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला असून हा मोठा धक्का आहे."
या आधी गुरुवारी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले होते.
हेही वाचा - महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया, सोनू सूदचे 'पुढचे पाऊल'
"... रुग्णालयाच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार, त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे आणि ते लाईफ सपोर्टवर असून आणि त्यांची प्रकृती चिंताजनक आहे," असे बास्करन यांनी सांगितले.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्यामुळे एस पी बालसुब्रह्मण्यम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या ते तज्ञ डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली असून त्यांच्या हेमोडायनामिक आणि क्लिनिकल पॅरामीटर्सवर सतत बारीक लक्ष ठेवले जात आहे," असेही त्यांनी सांगितले.
तेलुगु, तामिळ, कन्नड, हिंदी आणि मल्याळम चित्रपटासाठी सदाबहार गाणी गाणाऱ्या एस पी बालसुब्रह्मण्यम यांना पाच ऑगस्टला सर्दी आणि तापाच्या तक्रारीनंतर इथल्या इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं.