मुंबई - बॉलिवूड सिंगर सोनू निगमने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने म्यूझिक माफिया आणि स्टार पॉवरची उघडपणे चर्चा केली आहे. सध्या या इंडस्ट्रीतील वातावरण ज्या प्रकारचे आहे त्यातून कोणीतरी आत्महत्याही करु शकेल, असे सोनूने म्हटलंय.
सुशांत सिंहच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर सोनूने हा व्हिडिओ तयार केला आहे. फिल्म इंडस्ट्रीसह म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे मोनोपॉली चालते याचा पाढाच त्याने वाचून दाखवलाय. त्याने म्यूझिक कंपनीना माणुसकीने वागण्याचा सल्लाही दिलाय.
सोनू व्हिडिओमध्ये म्हणतो, ''मला म्यूझिक इंडस्ट्रीला विनंती करायचीय की, आज सुशांत सिंह राजपूत मरण पावलाय..एक अभिनेता मरण पावलाय, उद्या एखाद्या गायकाच्या, संगीतकाराच्या, गीतकाराच्या बाबतीतही अशी बातमी येऊ शकते. आपला जो संगीताचा माहोल आहे. दुर्दैवाने सिनेमापेक्षा मोठे माफिया संगीतात आहेत. व्यवसाय करणे आवश्यक आहे. प्रत्येकाला असे वाटते की आपण राज्य करावे. मी थोडा सुदैवी आहे कारण मी थोड्या कमी वयामध्ये आलो होतो. त्यामुळे या तावडीतून निसटलो. परंतु जे नवीन मुले आली आहेत त्यांच्यासाठी हे कठीण आहे. मला अनेक मुले याबद्दल सांगत असतात. वैतागले आहेत ते.''
सोनूने नव्या लोकांची व्यथा मांडताना पुढे सांगितले, ''या नव्या मुलांसोबत निर्मात्याला काम करायचे असते, संगीतकाराला काम करायचे असते परंतु म्यूझिक कंपनीला वेगळेच वाटते. तुम्ही महान आहात...तुम्ही कंट्रोल करता म्यूझिकला, तुम्ही कंट्रोल करता रेडिओवर कोणते गाणे वाजेल, सिनेमात काय असेल...पण असं करु नका. हा शाप उःशाप फार मोठी गोष्ट असते. फक्त दोन लोकांच्या हातामध्ये आहे म्यूझिक इंडस्ट्री. त्यांच्या हातामध्ये आहे संपूर्ण ताकत. पण मी यातून निसटलो. मी खूश आहे...पण मी पाहिलंय... नवीन गायक, संगीतकार, गीतकार यांच्या डोळ्यात फ्रस्टेशन पाहिलंय... रक्ताचे अश्रू रडतात कधी कधी. ते जर मेले तर तुमच्यावरही मोठे प्रश्न चिन्ह उभे राहिल.''
आपल्या या निवेदनात त्याने अप्रत्यक्ष सलमान खानवरही निशाणा साधलाय. तो म्हणतो, ''गायक, संगीतकार हे लोक गंधर्व आहेत...त्यांची प्रतारणा करु नका. माझ्या बाबतीत घडतंय...एखादे गाणे मी गातोय, तर तो अभिनेता म्हणतो...ज्याच्यावर आता बोट दाखवलं जातंय...तो म्हणतो याला गायला देऊ नका...त्याने अरजितसिंगसोबतही असे केलंय...हे काय आहे...तुमम्ही तुमची पॉवर अशी कशी वापरु शकता. नऊ नऊ गायकांना एक गाणे गायला लावले जाते..हे काय? एका सिंगरला तुम्ही १० गाणी गायला लावता आणि ११ व्या गाण्याला म्हणता आता तुला संधी देतो. तू माझ्या कंपनीत असशील तरच तुला काम देईन. तू कितीही चांगला कलाकार असशील तरी तुला काम देणार नाही....हे ठिक नाही.''
संगीताच्या क्षेत्रात सुरू असलेल्या एकाधिकारशाहीमुळे या इंडस्ट्रीला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकतो असेही सोनूने म्हटलंय.