मुंबई - बॉलिवूड अभिनेता सिध्दार्थ मल्होत्रा सध्या 'शेरशाह' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये गुंतला आहे. शूटींग कारगिलमध्ये होत असून त्याचा अपघात झाल्याची घटना घडली. हा अपघात बाईक चालवत असताना घडला. तो कारगिलच्या पहाडीमध्ये बाईक चालवत होता.
'शेरशाह' चित्रपटाचे त्या दिवसाचे शूटींग आटोपून तो परतत असताना ही घटना घडली. जखमी असतानाही तो दुसऱ्या दिवशी शूटींगला उपस्थित होता. अपघाताबद्दल बोलताना सिध्दार्थ म्हणाला, ''मी रस्त्यावर पडलो होतो. जखम बरी व्हायला किमान आठवडा लागेल. चित्रपटाचे शेड्यूल पाहता मी रिकव्हर व्हायला थांबणे योग्य नव्हते.''
तो लवकरच बरे होईल असेही म्हणाला, ''अशा प्रकारच्या घटना घडत असतात आणि शूटींगवर परिणाम होतो. मी थोडक्यात वाचलो. लवकरच मी पूर्ण बरा होईन.''
सिद्धार्थने कारगिलमधील शूटींग करणे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ''कारगिलमध्ये शूटींग करण्याचा नवा अनुभव आहे कारण इथे चित्रपटांचे शूटींग झालेले नाही. आम्ही नव्या जागेचा शोध घेतला. कारगिल युध्दाशी प्रमाणिक राहण्याचा आम्ही प्रयत्न केलाय.''
'शेरशाह' हा चित्रपट विक्रम बात्रा यांच्यावर आधारित आहे. या योध्द्याचा परमवीर चक्राने सन्मान झाला होता. 'शेरशाह' या चित्रपटाचे दिग्दर्शन विषणू वर्धन करीत आहेत. २०१० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.