मुंबई - एक व्हिलन चित्रपटात जबरदस्त व्यक्तीरेखा साकारलेले रितेश देशमुख आणि सिध्दार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. मरजावाँ या आगामी चित्रपटात त्यांचा पुन्हा एक जबरदस्त अभिनय पाहायला मिळणार आहे. खूप प्रतीक्षेनंतर या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर जारी करण्यात आले आहे.
प्रसिध्द झालेल्या पोस्टरवरुन हा एक थरारक अनुभव देणारा चित्रपट ठरु शकेल असे वाटते. या पोस्टरमध्ये सिध्दार्थ रक्ताने माखलेला असून त्याच्या मागे दशमुखी रावणाची प्रतीमा दिसते. या साठी दिलेली टॅगलाईनदेखील आकर्षक आहे. पोस्टरवर लिहिले आहे, ''इश्क में मरुंगा भी, मारुंगा भी.''
दुसऱ्या पोस्टरमध्ये रितेश देशमुखचा नवा अवतार पाहायला मिळत आहे. यात तो बुटका दिसत असून हातामध्ये बंदुक घेऊन आत्माविश्वासाने चालताना दिसतो. त्याच्या मागेही दशमुखी रावणाची प्रतिमा दिसते. या पोस्टरची टॅगलाईन आहे, ''कमिनेपण की हाईट तीन फुट.''
तिसऱ्या पोस्टरमध्ये रितेश देशमुख प्रेतांच्या पडलेल्या खचातून रक्तबंबाळ होऊन चालताना दिसतोय. याची टॅगलाईन आहे, ''मैं मारुंगा मर जायेगा, दुबारा जनम लेने से डर जायेगा.''
'मरजावाँ' हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मिलाप जव्हेरी यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात रकुल प्रीत सिंग आणि तारा सुतारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.