मुंबई - अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली मुलाखत चांगलीच गाजली. राजकारणा पलिकडचे मोदी जाणून घेण्यासाठी अक्षयने त्यांना काही प्रश्न विचारले. या प्रश्नांची चांगलीच खिल्ली उडवली गेली. आता ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थनेही ट्विट करत अक्षयला टोला लगावला आहे.
सिद्धार्थने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅग केले आहे. तुम्ही पुन्हा एकदा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहात. त्यामुळे या दरम्यान मला तुमची मुलाखत घ्यायला आवडेल. या मुलाखतीसाठी माझ्याकडे खूप प्रश्न आहेत. तुम्ही फळे कसे खाता, किती वेळ झोपता, तुमच्या सवयी आणि तुमचं व्यक्तिमत्त्व याबद्दल मला जाणून घ्यायचे आहे आणि माझ्याकडे भारतीय पासपोर्ट देखील आहे, असे सिद्धार्थने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नाव न घेता सिद्धार्थने अक्षयला चांगलाच टोला लगावला आहे. अक्षयने मोदींच्या घेतलेल्या मुलाखतीत हेच प्रश्न विचारले होते. याच पार्श्वभूमीवर सिद्धार्थने हे ट्विट केले आहे. आता सिद्धार्थच्या या ट्विटला अक्षय काही उत्तर देणार की याकडे दुर्लक्ष करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.