मुंबई - बॉलिवूडचा मॉडेल अभिनेता मिलिंद सोमण त्याच्या नवीन फोटोमुळे सध्या चर्चेत आला आहे. हा फोटो पाहून अनेक चाहत्यांना अक्षय कुमारची आठवण आली आहे. मिलिंदने आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो अक्षय कुमारच्या लक्ष्मी चित्रपटातील लूकसारखा आहे. त्याने आपल्या नाकात नथ घातली असून चेहऱ्याचा एक भाग गुलालाने रंगलेला दिसत आहे.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये मिलिंदने लिहिलंय, मुंबईच्या कर्जतजवळ काही वेळ घालवला आणि आता चेन्नईला रवाना होत आहे. मला माहिती आहे की, सध्या होळीची वेळ नाही. परंतु जेव्हा तुम्हाला अॅक्ट करण्याचा प्रसंग येईल, तेव्हा तुम्हाला वेळ आणि जागेबाबत प्रश्न पडला नाही पाहिजे.
मिलिंद सोमणच्या या फोटोवर चाहते भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.
मिलिंदचा ४ नोव्हेंबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मिलींद सोमणने बीचवर विवस्त्र धावत असतानाचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो त्याची पत्नी अंकिताने क्लिक केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते, ''हॅप्पी बर्थ डे टू मी.''
गोव्याच्या वास्को पोलीस स्टेशनमध्ये मिलिंद सोमणच्या विरोधात 'गोवा सुरक्षा मंच' या संघटनेने तक्रार दाखल केली आहे. मिलिंदने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोमुळे गोव्याच्या संस्कृतीचा अपमान होत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अद्याप मिलिंद सोमणवर कोणतीही कारवाई झालेली नाही. परंतु चौकशीसाठी त्याला पोलिसांसमोर जावे लागेल आणि कारवाईचाही सामना करावा लागेल.