मुंबई - 'हम दिल दे चुके सनम'नंतर सलमान खान पुन्हा एकदा संजय लीला भन्साळींसोबत काम करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि आलिया पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार असून काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. 'इंशाअल्लाह' असं या चित्रपटाचं शीर्षक आहे.
आलिया आणि सलमानला पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण लवकरच सुरू होणार असून यासाठी आलिया आणि सलमान उत्तराखंडच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांत जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या ऑगस्टमध्ये हे कलाकार चित्रीकरणासाठी उत्तराखंडला रवाना होणार आहेत. तर भन्साळींनी या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वाराणसी आणि उत्तराखंडची निवड केली आहे. २०२० मध्ये ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता या तारखेत बदल करण्यात आले असून 'सूर्यवंशी' आता २७ मार्चला प्रदर्शित होणार आहे.