मुंबई - ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज कॅन्सरने निधन झाले. बॉलिवूडचे एक प्रसिद्ध अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. ऋषी कपूर मागच्या वर्षी लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेऊन भारतात परतले होते.
'मेरा नाम जोकर' या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यामध्ये त्यांनी त्यांचे वडील राज कपूर यांच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट बाल कलाकार' म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
त्यानंतर, प्रमुख भूमीका म्हणून 'बॉबी' हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. याचे दिग्दर्शनही त्यांच्या वडिलांनी केले होते. ऋषी कपूर यांना 'लाँच' करण्यासाठी 'बॉबी' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती, असा बऱ्याच जणांचा समज आहे. मात्र, ऋषी कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट त्यांना अपघातानेच मिळाला होता.
खरेतर, मेरा नाम जोकरच्या निर्मितीनंतर राज कपूर हे कर्जात बुडाले होते. हे कर्ज फेडण्यासाठीच त्यांनी 'बॉबी'ची निर्मिती करण्यास सुरूवात केली. यामध्ये राज कपूर यांना किशोरवयीन प्रेमी युगलाची कथा दाखवायची होती. त्यासाठी, त्याकाळी सुपरस्टार आणि तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय अशा राजेश खन्नाला चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत घेण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, प्रसिद्ध अशा राजेश खन्नाची सायनिंग अमाऊंट देण्याइतपत पैसे कपूर यांच्याकडे नसल्याने, त्यांना दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागला. मग पैसे वाचवण्यासाठी घरातीलच अभिनेता घ्यायचे ठरल्यानंतर, ऋषी कपूर यांची 'बॉबी'साठी वर्णी लागली. हा चित्रपट प्रचंड गाजला, आणि या चित्रपटानेच त्यांना 'चॉकलेट हीरो' अशी ओळख मिळवून दिली. स्वतः ऋषी कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केले होते.
त्यानंतर 'बॉबी'ने बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत भरपूर गल्ला गोळा केला. १९७३ला आलेल्या 'बॉबी'नंतर २००० सालापर्यंत त्यांनी एक रोमँटिक नायक अशाच प्रकारच्या भूमीका केल्या, आणि त्या गाजल्याही!
हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा, सर्व स्तरातून हळहळ