नवी दिल्ली - ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर आज अनंतात विलीन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थित राहण्यासाठी, दिल्ली पोलिसांनी त्यांची मुलगी रिधिमा यांना मुंबईला जाण्याची परवानगी दिली होती. मात्र तरीही त्या आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देऊ शकल्या नाहीत.
काल रात्री ऋषी कपूर यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मुंबईला जाण्यासाठी रिधिमा यांनी दिल्ली पोलिसांना परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी ही परवानगी नाकारली होती. त्यानंतर आज सकाळी ऋषी कपूर यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी रिधिमा यांना मुंबईला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार त्या एका विशेष विमानाने दिल्लीहून मुंबईला येणार होत्या. मात्र, ऐनवेळी दिल्ली सरकारने त्यांच्या विमानाला उड्डाण करण्यास परवानगी नाकारल्याने रिधिमा या आज मुंबईला जाऊ शकल्या नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार आता रिधिमा आणि त्यांचे कुटुंबीय उद्या सकाळी मुंबईला रवाना होतील.
दरम्यान, बॉलिवूडसाठी गेले दोन दिवस अत्यंत धक्कादायक ठरले आहेत. काल अभिनेता इरफान खान याचे कॅन्सरने निधन झाले होते, त्यानंतर आज ऋषी कपूर यांनाही कॅन्सरमुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. ऋषी कपूर यांच्यावर गिरगावच्या चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. यावेळी स्मशानभूमीमध्ये केवळ १२ लोक उपस्थित होते.
हेही वाचा : ऋषी कपूर यांचे चित्रपट पाहून मी लहानाचा मोठा झालो - रवी किशन