मुंबई - सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी डॉक्टरांवरच हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कलाविश्वातील कलाकारांनी अशा घटनांबाबत निषेध व्यक्त करुन नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही केले. आता अभिनेत्री रवीना टंडनने डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात एक अभियान सुरू केले आहे. या अभियानाअंतर्गत रवीना नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.
'जितेगा इंडिया जितेंगे हम', अशी टॅगलाईन असलेले हे अभियान आहे. रवीनाने याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केली. या व्हिडिओतून तिने नागरिकांना डॉक्टरांच्या कार्याचा सन्मान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी बाळगण्याचेही आवाहन केले आहे.
कोरोनासारख्या गंभीर आजाराशी लढण्यासाठी आपल्या देशातील कोरोना योद्धे अहोरात्र मेहनत घेत आहेत. दररोज ते कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी घराबाहेर पडतात. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटता येत नाही. आपल्या कुटुंबापासून लांब राहून ते निस्वार्थ सेवा करत आहेत. त्यांच्या या कार्याचा आपण सर्वांनी सन्मान केला पाहिजे. तसेच, सोशल मीडियावरही कोणत्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रवीनाने आपल्या व्हिडिओतून केले आहे.