मुंबई - 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच एका हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रूही अफ्झा' असं या चित्रपटाचं शीर्षक असून यात ती राजकुमार रावसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
या जोडीला स्क्रीनवर पहिल्यांदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतानाच आता या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. जान्हवी कपूरनं आपल्या इन्स्टाग्रामवरून स्टोरी शेअर करत याबद्दलची माहिती दिली.
या चित्रपटाचं दिग्दर्शन हार्दिक मेहता करत असून दिनेश विजन आणि म्रीघदीप सिंग यांची निर्मिती असणार आहे. हा चित्रपट २०२० मध्ये २० मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या राजकुमारच्या 'स्त्री' या हॉरर कॉमेडी सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अशात आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का, हे पाहणं रंजक असणार आहे.