मुंबई - रविवार २४ जानेवारीला बॉलिवूड अभिनेता वरुण धवन बोहल्यावर चढला. त्याचे त्याची बऱ्याच वर्षांची गर्लफ्रेंड नताशा दलाल सोबत शुभमंगल झाले. खरंतर त्याला अनुष्का-विराट, रणवीर-दीपिका प्रमाणे परदेशात लग्नसोहळा भरवायचा होता व त्यादृष्टीने तयारीही सुरु होती, परंतु गेल्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीमुळे त्या सर्वावर पाणी फेरले गेले. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही त्यामुळे ‘अजून किती थांबायचं’ आसा विचार करत त्याने अलिबाग येथील एका आलिशान रिसॉर्टमध्ये लग्न केले. मोजकेच लोक एकत्र येण्याच्या अटींमुळे लग्नाला जवळचे नातेवाईक व मित्रमैत्रिणी आदि उपस्थित होते. २६ तारखेला वरुण मुंबईत मोठे रिसेप्शन ठेवणार आहे, जेणेकरून बॉलिवूडकरांना त्याला आशीर्वाद देण्याची संधी मिळेल.
गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात अनेक सेलिब्रिटीज बोहल्यावर चढल्या. बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिने रोहनप्रीत सिंग बरोबर लग्न केले. खरंतर ज्या सिंगिंग रियालिटी शोची ती जज होती, रोहन त्याच शोमध्ये स्पर्धक होता. पण म्हणतात ना लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात! प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपटासाठी आवाज देणाऱ्या उदित नारायण यांचे सुपुत्र आदित्य नारायण झा याने अभिनेत्री श्वेता अगरवालसोबत सात फेरे घेतले. त्या दोघांची भेट एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती. त्या चित्रपटाचे नाव होते ‘शापित’, परंतु या आदित्य-श्वेता जोडीला कोणाची नजर ना लागो. ‘बाहुबली’ मध्ये भल्लालदेव साकारणारा राणा डग्गुबाती हा देखील मिहिका बजाज सोबत लग्नबंधनात अडकला. ती एक इंटिरियर डिझायनर आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत राणाने पहिले लग्न केले होते परंतु दोघांनी घटस्फोट घेतला.
मराठी कलाकारांचेही शुभमंगल सावधान -
या सर्व गदारोळात आपली मराठी मनोरंजनसृष्टीही मागे नव्हती. लॉकडाऊनपश्चात मराठी कलाकारही बोहल्यावर चढले. गेल्या वर्षीच कार्तिकी गायकवाड, जी सारेगामापा मराठी लिटिल चॅम्प्स ची विजेती होती, रोहन पिसे सोबत विवाहबंधनात अडकली. याच वर्षी अभिनेत्री अभिज्ञा भावे ने मेहुल पै सोबत लग्नगाठ बांधली. हे अभिज्ञाचे दुसरे लग्न. तसेच बहारदार नृत्यासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मानसी नाईकचा नुकताच बॉक्सर प्रदीप खरेरा सोबत विवाह संपन्न झाला. तसेच मराठी मनोरंजसृष्टीतील आशुतोष कुलकर्णीचे रुचिका पाटील सोबत तर अभिनेत्री प्राजक्ता परबचे अंकुश मरोदे सोबत लग्न झाले.