दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी येऊन थडकले आहेत. नवीन कृषी कायदा रद्द करा या मागणीसाठी गेली १२ दिवस त्यांचे आंदोलन सुरू आहे. या शेतकऱ्यांना समाजातील विविध थरातून पाठिंबा मिळत चाललाय. मनोरंजन जगतही यात मागे नाही. अनेक कलाकार शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी सोशल मीडियावर आपली मते व्यक्त करीत आहे. या यादीत आता अभिनेत्री प्रियांका चोप्राही सहभागी झाली आहे.
पंजाबी गायक अभिनेता दिलजीत दोसंझ या आंदोलनास स्वतः सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. या आंदोलनात सर्व धर्माचे लोक सहभागी झाले असून शांततेने हे आंदोलन सुरू असल्याचे आणि या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांना प्रसिध्दी देण्याचे आवाहन त्याने शेतकऱ्यांसमोर बोलताना केले होते. त्याने एक ट्विट केले आहे. यात दोन फोटो दिसतात. एका फोटोत आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची एक पंगत दिसत असून त्यांना जेवण वाढण्याचे काम अन्नदाता असलेले शेतकरी करीत असल्याचे दिसते. दुसऱ्या फोटोत शेतकऱ्यांना पोलीस जेवण वाढत असल्याचे दिसते.
हेही वाचा -ये रिश्ता क्या कहलाता है' फेम दिव्या भटनागरचे निधन
दिलजीत दोसंझचे हे ट्विट अभिनेत्री प्रियंका चोप्राने शेअर केले असून यावर तिने रिट्विटही केले आहे. प्रियंका म्हणते, ''आमचे शेतकरी हे भारताचे अन्न सैनिक आहेत. त्यांची भीती दूर करणे आवश्यक आहे. त्यांच्या आशा पूर्ण होण्याची गरज आहे. एक लोकशाही म्हणून आपण हे सुनिश्चित केले पाहिजे की हे संकटे लवकरात लवकर संपेल.''
हेही वाचा -माझ्यासाठी हे एक विशेष वर्ष - नवाजुद्दीन सिद्दीकी
प्रियंकाच्या या ट्विटला तिच्या हजारो चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. आजवर बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यात मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख, प्रकाश राज, स्वरा भास्कर, मिका सिंग, प्रिती झिंटा, रिचा चढ्ढा, हंसल मेहता, अनुभव सिन्हा यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.