मुंबई : नार्कोटिस्क कंट्रोल ब्युरो (एनसीबी)ने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण, रकुल प्रित सिंग, दीपिकाची एक्स मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटा यांची शुक्रवार-शनिवारी चौकशी केली. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या ड्रग्ज सिंडिकेटबाबत सुरू असलेल्या या चौकशीनंतर एनसीबीने या चौघींचेही मोबाईल जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय पुरावे कायद्यानुसार हे मोबाईल जप्त करण्यात आल्याचे एनसीबीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी रकुलची चार तास, तर शनिवारी दीपिकाची पाच तास चौकशी करण्यात आली. तर करिश्माची शुक्रवार आणि शनिवार असे दोनही दिवस चौकशी करण्यात आली होती. ड्रग्ससंबंधी संभाषण मोबाईलमधील व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये झाले असल्याचे समोर आल्यामुळे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच, सुशांतची माजी टॅलेंट मॅनेजर जया शाह हिचाही मोबाईल एनसीबीने जप्त केला आहे.
दीपिका-रकुल व्यतिरिक्त एनसीबीने शुक्रवारी बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांचीही काही तास चौकशी केली होती. रकुल आणि सिमॉन या सुशांतची प्रियसी रिया चक्रवर्तीच्या जवळच्या मैत्रिणी असल्यामुळे त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. रियाला याप्रकरणी यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. यासोबतच एनसीबीने रियाचा भाऊ शोविकसह अन्य १७ जणांना याप्रकरणी अटक केली आहे.
हेही वाचा : दीपिका पदुकोणची एनसीबीकडून तब्बल 5 तास चौकशी; उत्तरांवर एनसीबी असमाधानी