मुंबई - संगीत हा आपल्या आयुष्याचा एक अभिवाज्य घटक आहे, त्याशिवाय कोणाचेही आयुष्य अपुरेच. शास्त्रीय संगीत असो, लोकसंगीत असो किंवा हल्लीचे नवनवीन प्रकार असोत संगीतकार त्यांच्या व समाजाच्या भावना या माध्यमातून उत्तमरीत्या सादर करीत असतो. या मधुर संगीताचा प्रेक्षकांच्या आयुष्यावर होणारा सुरेख असा परिणाम कोणीही नाकारू शकत नाही. त्यातही २०व्या शतकात लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजत सादर झालेली गाणी म्हणजे संगीतातील परिपूर्ण अशी मेजवानी. त्यांवरच आधारीत 'लता श्रुती संवाद' या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे रविवारी अनावरण करण्यात आले.
यापूर्वी देखील लता मंगेशकर यांच्या जीवनातील संघर्ष आणि यशोगाथा मांडणारी अनेक पुस्तके आली आहेत. मात्र, आता पहिल्यांदाच त्यांच्या संगीताचा सखोल अभ्यास या पुस्तकाद्वारे आपल्या समोर येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीवरील भारतीय शास्त्रीय संगीताचा लोकांवर होणाऱ्या प्रभावावर लक्ष केंद्रित करणारे ‘कला संगम’ या पुस्तकाचे लेखक अजय देशपांडे यांनी यावेळी लता मंगेशकरांच्या गाण्यांचा बारकाईने अभ्यास केला आहे. या पुस्तकात शास्त्रीय बंदिश, भजन, गीत, तराणा, दादरा, लॉरी, ठुमरी, मुजरा आणि गझल इत्यादींचा याचबरोबर लतादीदींच्या संगीताच्या अनेक घटकांचा सखोल अभ्यास आहे.
सोमवारी लतादीदींच्या ९१व्या वाढदिवसानिमित्त अजय यांनी या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रदर्शित केले. लवकरच लता श्रुती संवाद हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे त्यांनी सांगितले.