मुंबई - यावर्षीच्या बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट आहे. सहा महिने चालणार असणाऱ्या या शोचा तीन महिन्यांचा पूर्वार्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर असणार आहे. त्यानंतर तो टेलिव्हिजनवर येणार आहे. बिग बॉस हा रियालिटी शो त्यात होणाऱ्या शाब्दिक मारामाऱ्या (शारीरिक मारामाऱ्यांना मनाई आहे) आणि कॉंट्रोव्हर्सीजमुळे चर्चेत राहतो. अनेक सदस्य शिवीगाळही करताना दिसतात. टेलिव्हिजनवर त्यावेळी ‘बीप’ चा वापर केला जातो. परंतु आता हा शो ओटीटी वर २४ तास दिसणार असून तेथे सेन्सॉरशिपची आडकाठी नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवीगाळ होणार याबद्दल शंकाच नाही.
गेले दशकभर टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ चे होस्टिंग सलमान खान करीत आलाय आणि याहीवर्षी तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसेल. परंतु बिग बॉस ओटीटीच्या सूत्रसंचालनासाठी करण जोहरची निवड करण्यात आली आहे. ‘तुला बिग बॉस च्या घरात जायला आवडेल का? आणि जावंच लागलं तर त्या घरात तुला कोणाबरोबर बंदिस्त व्हायला आवडेल?’ या प्रश्नावर करण जोहर उत्तरला की, ‘सर्वप्रथम म्हणजे या घरात मोबाईल वापरावर बंदी आहे आणि मी माझ्या मोबाइलपासून तासभरसुद्धा लांब राहू शकत नाही. त्यामुळे मी कधीच 'बिग बॉस च्या घरात जाणार नाही.’ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, ‘जर त्या घरात राहण्यासाठी जावंच लागलं तर मी माझ्या मैत्रिणी करीना आणि मलायका यांच्यासोबत जाईन. कारण त्याही त्यांच्या मोबाइलशिवाय जगूच शकत नाही. आणि त्यामुळे होणारी गम्मत व त्यांची त्रेधातिरपीट मला जवळून बघायला आवडेल.’
करण जोहर म्हणजेच केजोचे या दोन्ही मोहक अभिनेत्रींसोबत दृढ नाते आहे. करीना कपूर खान उर्फ बेबो त्याला भाऊ मानते, तर मलायका अरोरा उर्फ मल्ला सोबत त्याची जिवलग मैत्री आहे. हे देखील विसरू नका की करीना व मलायका देखील खास मैत्रिणी आहेत आणि त्या अनेकदा एकत्र पार्टीला जातात व खास दिवस साजरे करतात. तसेच त्या करण जोहरच्या प्रत्येक पार्टीला आवर्जून हजेरी लावतात.
''बेबो (करीना कपूर खान) व मल्ला (मलायका अरोरा) यांच्यासोबत शोमध्ये प्रवेश करण्याबाबत माझी काहीच हरकत नाही. अरे देवा! त्या दोघी त्यांच्या फोन्सशिवाय घरामध्ये असल्यास खूपच धमाल येईल. आमच्या या त्रिकूटामधील नाते पाहता बिग बॉस ओटीटी घरामध्ये मी, बेबो व मल्ला आमच्या फोन्सशिवाय असल्यास ती एक धमाल ‘रोलरकास्टर राइड’असेल”, असे करण जोहर हसत हसत म्हणाला. हे तिघेही गॉसिप करण्यात उस्ताद आहेत त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटसृष्टीमधील बरीच ‘आतली’ माहिती मिळू शकेल.
रविवारी ८ ऑगस्ट पासून बिग बॉस ओटीटीचा खेळ सुरु झाला आहे.