लखनौ - बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोना व्हायरसने संक्रमित झाली आहे. कोरोना व्हायरससंबंधी रविवारी तिची चाचणी करण्यात आली होती. यात तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. अशा प्रकारे तिसऱ्या चाचणीतही कनिका पॉझिटीव्ह आढळली आहे. हा रिपोर्ट मंगळवारी रात्री प्राप्त झाला.
कनिकाचा संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS)मध्ये इलाज सुरू आहे.
SGPGIMS चे संचालक प्रोफेसर आर. के. धिमान यांनी कनिकाच्या कोरोना व्हायरस पॉझिटीव्ह रिपोर्टच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जोपर्यंत तिचे दोन रिपोर्ट निगेटीव्ह येत नाहीत तोपर्यंत तिच्यावर उपचार सुरू राहणार आहेत.
दरम्यान कनिकाचा मित्र ओजस देसाईचा कोविड -१९ चा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. ओजस दोन दिवस कनिकासोबत हॉटेल ताजमध्ये राहिला होता. त्यानंतर तो भूमिगत झाला होता.
ओजसच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात त्याने म्हटलंय की, त्याने मुंबईच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात स्वतःची कोरोनाची चाचणी केली होती. यात तो निगेटीव्ह ठरला. इतकेच नाही तर त्याने आपला रिपोर्ट सोशल मीडियावरही पोस्ट केला होता.
या महिन्याच्या सुरूवातील कनिका कपूर लखनौच्या पार्टीमध्ये सहभागी झाली होती. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली असून सर्व जण निगेटीव्ह ठरले आहेत.