मुंबई - बॉलिवूडची 'क्विन' कंगना रनौत लवकरच जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिने याबाबत माहिती दिली होती. जयललिता यांच्या जीवनावरील बायोपिक हा हिंदी भाषेसह तमिळ भाषेतही प्रदर्शित केला जाणार आहे. यासाठी कंगना तमिळ भाषेचे प्रशिक्षण घेणार आहे.
कंगनाने याबाबत एका माध्यमाशी बोलताना माहिती दिली आहे. ती म्हणाली, की 'चित्रपटातील बरेचसे सीन हे तमिळ भाषेतील राहणार आहेत. त्यामुळे मला तमिळ भाषा शिकावी लागणार आहे. 'पंगा' आणि 'मेंटल है क्या' या चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यानंतर तमिळ भाषा शिकण्यास सुरुवात करणार असल्याचे तिने सांगितले.
'जयललिता यांच्या बायोपिकची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला असे वाटले, की त्यांचे आयुष्य आणि माझे आयुष्य हे काही प्रमाणात सारखेच आहे. त्यामुळे मी या बायोपिकसाठी उत्साही आहे', असेही ती पुढे म्हणाली.
कंगनाने या बायोपिकसाठी तब्बल २४ कोटींचे मानधन घेतले आहे. बॉलिवूडमधील ती सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक बनली आहे. या बायोपिकच्या चित्रीकरणाचे काम सप्टेंबर महिन्यात सुरु होणार आहे.
जयललिता यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, त्या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या. पुढे त्यांनी राजकारणात एन्ट्री घेतली. राजकिय क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला होता. पुढे त्या तमिळनाडुच्या मुख्यमंत्री बनल्या. ५ डिसेंबर २०१६ ला त्यांचे चेन्नईमध्ये निधन झाले.