मुंबई - काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचारावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने व्हीडिओच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. सोमवारी जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सरपंच अजय पंडित यांची गोळ्या घालून हत्या केली. ४० वर्षीय अजय पंडित यांना घरापासून ५० मीटर अंतरावर गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं.
एखाद्या विषयाचे आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी चित्रपटसृष्टीतली काही कलाकार हातात मेणबत्ती घेऊन, कार्ड घेऊन रस्त्यावर उतरतात. जोपर्यंत त्यामागे जिहादी अजेंडा असतो. मात्र, जेव्हा एखाद्याला न्याय देण्याची वेळ येते तेव्हा त्यांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही. सेक्युलँरिझमचे धडे शिकवणारे आता गप्प बसले आहेत, असे कंगणाने व्हीडिओमध्ये म्हटले आहे.
कंगनाने सरपंच अजय पंडित यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्याय देण्याची तसंच दोषींवर कारवाई करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा काश्मीरमध्ये परतता आले पाहिजे. त्यांना त्यांची भूमी पुन्हा मिळाली पाहिजे. तसेच काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा हिंदू धर्माची स्थापना झाली पाहिजे, असेही कंगनाने व्हीडिओमध्ये म्हटलं.