मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघी बहिणींना चौकशीसाठी मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले आहे. त्यामुळे आज (सोमवार) आणि उद्या असे दोन दिवस त्यांना वांद्रे पोलीस ठाण्यात हजर रहावे लागणार आहे. या चौकशीला दोघी बहिणी उपस्थित राहतील की नाही याकडे आता लक्ष लागले आहे.
काय आहे प्रकरण..?
काही दिवसांपूर्वी कंगना रणौतच्या ट्विटर अकाऊंटवरून एक वादग्रस्त ट्विट करण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले होते की, बॉलिवूडमध्ये हिंदू- मुस्लीम तणाव असून, मुस्लीम कलाकार आणि हिंदू कलाकार यांच्यामध्ये मतभेद आहेत. या ट्विटमुळे सामाजिक द्वेष वाढल्याचा आरोप करत, मूनवर आली खान यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
खान यांनी दाखल केलेल्या या याचिकेच्या आधारे न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच, वांद्रे न्यायालयाने पोलिसांना कंगनाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून, त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
अंधेरी न्यायालय काय देणार निर्णय?
दरम्यान, वांद्र्याप्रमाणेच मुंबईतील अंधेरी मॅजिस्ट्रेट न्यायालयातही कंगना रणौतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका आली कशीफ खान देशमुख यांच्याकडून दाखल करण्यात आलेली आहे. कंगना रणौतने तिच्या ट्विटर अकाउंटवर दोन समाजांमध्ये वैमनस्य निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य वारंवार केले असून, त्यासंबंधी कलमांनुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी 10 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : नवा वाद : कंगना रणौतचा आमीर खानवर निशाणा