मुंबई - बाप-मुलाच्या नात्यावर आधारित नाट्यमय चित्रपट 'इट्स माय लाइफ' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार नाही तर टीव्हीवर प्रदर्शित होईल. या चित्रपटात नाना पाटेकर, हरमन बावेजा आणि जेनेलिया डिसोझा मुख्य भूमिकेत आहेत. अनीस बाझ्मी दिग्दर्शित हा चित्रपट २००६ मधील तेलुगू हिट 'बोम्मारिलू'चा रिमेक असून २९ नोव्हेंबरला छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
इट्स माय लाईफ हे उत्तम मनोरंजन पॅकेज
बाझ्मी म्हणाले, "मी जेव्हा जेव्हा एखादी स्क्रिप्ट पाहतो, तेव्हा मी स्वतःला प्रेक्षकांसमोर ठेवतो आणि मनोरंजन होते की नाही ते पाहतो. या चित्रपटात विनोद, नाट्य, रोमान्स आणि एक उत्तम स्टार कास्ट आहे. या दृष्टिकोनातून माझे मत आहे की, "इट्स माय लाइफ" एक उत्तम मनोरंजन पॅकेज आहे. मला खात्री आहे की टीव्ही रिलीजमुळे प्रत्येकाचा मूड बनेल. विशेषत: आत्ताच्या काळासाठी हा परिपूर्ण निर्णय आहे. "
आपला भाऊ संजय कपूर यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती करणारे बोनी कपूर म्हणाले, "चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही कोणतीही भेसळ न करता कौटुंबिक मनोरंजन करणार आहोत. जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहोचण्याचे टीव्ही हे उत्तम माध्यम आहे. पहिल्यांदाच या माध्यमातून प्रेक्षकांसमोर जात आहोत याचा आनंद वाटतो.''
संजय कपूर म्हणाले, "जेव्हा मी लोकप्रिय तेलुगू चित्रपट 'बोम्मारिलू' चा हिंदी रिमेक बनविण्याची कल्पना केली, तेव्हा माझा विश्वास होता की ज्यांना बॉलिवूड चित्रपट आवडतात त्यांना हा चित्रपटदेखील आवडेल."
चित्रपटात नाना पाटेकर याने वडिलांची भूमिका साकारली आहे. ही भूमिका तेलुगू चित्रपटात प्रकाश राजने केली होती. या चित्रपटाला शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचा प्रीमियर झी सिनेमावर होणार असून त्याचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला.