मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने मंगळवारी एक ट्विट करुन साऱ्या जगाला आश्चर्यचकित केले. तिने स्वत: ची तुलना हॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री मेरील स्ट्रीपशी केली. तिच्या या ट्विटला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचा दावा कंगनाने केला आहे. जे लोक याच्याशी असहमत होते त्यांना तार्किक युक्तिवाद करणे झेपले नसल्याचे तिने म्हटलंय.

९ फेब्रुवारी रोजी कंगनाने असे सांगितले की, “जर या ग्रहावरील कोणत्याही अन्य अभिनेत्रीने माझ्यापेक्षा जास्त व्याप्ती आणि कलाकुशलता दाखविली तर ती चर्चेसाठी खुली आहे”. तिने तिच्या आगामी चित्रपट 'थलायवी' आणि 'धाकड' मधील अनेक फोटो शेअर केले आहेत. यात कंगनाच्या शरीरात झालेले बदल दिसतात. 'थलायवी' चित्रपटातील भूमिकेसाठी तिने आपले वजन वाढवले होते आणि 'धाकड' चित्रपटासाठी वाढलेले वजन घटवले होते.

"मोठ्या परिवर्तनाचा इशारा, ज्या प्रकारची क्षमता एक कलाकार म्हणून माझ्याकडे आहे ती क्षमता या ग्रहावरील इतर कोणत्याही अभिनेत्रीकडे याक्षणाला नाही, विविध व्यक्तीरेखा साकारण्यासाठी माझ्याकडे मेरील स्ट्रीपसारखी प्रतिभा आहे. परंतु मी गॅल गॅडोटसारखे कुशल अॅक्शन करू शकते आणि ग्लॅमरदेखील.'', असे कंगनाने लिहित 'थलायवी' आणि 'धाकड' या तिच्या चित्रपटांची शीर्षक हॅशटॅगमध्ये टाकली आहे.

''माझ्यापेक्ष जास्त क्षमता, तेज, आणि कलाकुशलता या ग्रहावरील इतर अभिनेत्रीने दाखवू शकल्यास मी माझ्या गर्विष्ठपणाचा त्याग करण्याचे वचन देते, तोपर्यंत मला नक्कीच माझा अभिमान राहील # थलावी # धाकड," असेही तिने पुढे म्हटलंय.

'कंगना इतकी त्रासलेली का आहे?' अशी विचारणा जेव्हा नेटीझन्सने तिच्या ट्विटवर केली तेव्हा, '(भारतीय लोक) गोऱ्या लोकांची पूजा का करतात?', असा प्रतिप्रश्न तिने केला.
आपल्या बाजूनी चर्चा संपवताना कंगना म्हणाली, ''आज बहुतेक कॉमेंट्स मला प्रोत्साहन देत आहेत, जे माझ्याशी सहमत नाहीत ते केवळ धमकवतात किंवा ट्रोल करतात. ते कोणतेही तर्कसंगत विधाने किंवा माझ्यासारखी कोणी इतर क्षमता आणि तेज असलेल्या अभिनेत्रीचा पुरावा देत नाहीत. याचाच अर्थ मी माझे म्हणणे सिद्ध केले असे मानूयात, धन्यवाद.''

याआधी कंगनाने स्वीडिश पर्यावरणीय कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला डंब म्हटले होते. आंतरराष्ट्री पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोनाला पाठिंबा दर्शवणारे ट्विट केल्यानंतर तिच्यावरही ती भडकली होती. दिलजीत दोसांझसोबत तिचे अधूनमधून ट्विटर युध्द झडत असते. प्रियंका चोप्रावरही तोंडसुख घ्यायची संधी ती सोडत नाही.