मुंबई - अक्षय कुमारने मतदान केले नाही, यावरुन त्याला ट्रोल केले जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अराजकीय मुलाखत त्याने घेतली होती. त्यामुळे मोदी विरोधकांच्या निशाण्यावर तो होता. त्यातच असंख्य बॉलिवूडकरांनी मतदान करत आपले फोटो सोशल मीयावर शेअर केले होते. त्याची पत्नी ट्विंकल खन्नानेदेखील मुंबईत मतदान केले होते. मात्र अक्षय मात्र मतदानापासून लांबच होता.
अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे त्याचे मतदान भारतात नाही. यामुळेच त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न नेटीझन्सनी केला आहे. काही पत्रकारांनीदेखील त्याला हा प्रश्न विचारून उत्तर मिळवायचा प्रयत्न केला. मात्र त्याने यावर भाष्य केले नव्हते. आज त्याने आपली बाजू मांडणारे ट्विट करीत ट्रेलर्सना उत्तर दिले आहे.
अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिले आहे, 'माझ्या नागरिकत्वाबद्दल सोशल मीडियावर विनाकारण उत्सुकता आणि नकरात्मकता का दाखवली जातेय, हे खरच लक्षात येत नाही. माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट आहे, हे मी कधीच नाकारले अथवा लपवलेलेदेखील नाही. गेल्या ७ वर्षांत मी एकदाही कॅनडाला गेलो नाही. मी भारतात काम करतो आणि येथील सर्व प्रकारचे करही भारतो. या इतक्या वर्षांमध्ये मला कधीही माझे भारताप्रती देशप्रेमसिद्ध करण्याची गरज भासली नाही. माझ्या नागरिकत्वाच्या मुद्यावरून मला विनाकारण वादात अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा मुद्दा खासगी, कायदेशीर, अराजकीय आणि कोणाशीही संबंध नसलेला आहे. मी नेहमीच भारताला मजबूत बनवण्यासाठी माझ्यापरीने योगदान देत राहीन'.