मुंबई - बॉलीवूड अभिनेता विक्रांत मेस्सी याचा आज वाढदिवस आहे. अवघ्या १६ वर्षाच्या आपल्या करिअर मध्ये दमदार अभिनयामुळे आज तो घराघरात लोकप्रिय ठरला आहे. 'बालिका वधू' या मालिकेतून आपली ओळख निर्माण करणाऱ्या विक्रांतने आता मोठ्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
विक्रांतने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारल्या आहेत. 'अ डेथ इन गुंज' या चित्रपटात त्याने आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केलं होतं. मालिके सोबतच त्याने वेब विश्वात देखील कमालीचा अभिनय केला आहे. याचे उदाहरण म्हणजे मिर्झिया वेब सीरिज मध्ये त्याने साकारलेले बबलू भैया हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. ही भूमिका जरी लहान होती तरीही विक्रांत च्या अभिनयामुळे ती लक्षात राहिली.
![HBD Vikrant Massey: A boy-next-door who made it big in showbiz](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/vikran-massey_0304newsroom_1585886012_605.jpg)
विक्रांतने डिस्ने इंडियाच्या 'धूम मचाव धूम' या टीव्ही शो मध्ये आपल्या करीअर च्या सुरुवातीला काम केले होते. 2007 साली आलेल्या या कॉमेडी ड्रामा मालिकेतून विक्रांतच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळाली. त्याच्यातला कोरिओग्राफर देखील यानिमित्ताने बाहेर आला. त्यानंतर त्याने 'कहा हू मै', 'धरम वीर' यासारख्या मालिका मधे देखील भूमिका साकारल्या. पुढे त्याला 'कबुल हैं' या मालिकेतून घराघरात ओळकह मिळाली. यामध्ये त्याने 'अयान' हे पात्र साकारले होते. नंतर त्याने 'ये हैं आशिकी', या मालिकेसाठी 'कबुल हैं' मालिका सोडली होती.
विक्रांतने 'लुटेरा' चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याला रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा यांच्यासोबत भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर देखील चांगला प्रतिसाद मिळाला. त्याने साकारलेले देवदास मुखर्जी ही भूमिका सर्वांच्या लक्षात राहिली.
काही महिन्यांपूर्वीच त्याला दीपिका पदुकोण सोबत 'छपाक' चित्रपटात भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या चित्रपटात देखील त्याने साकारलेली भूमिका चांगलीच भाव खाऊन गेली.
या चित्रपटा पूर्वी त्याने 'दिल धडकने दो', 'लीपस्टिक अंडर माय बुरखा' आणि 'हाफ गर्लफ्रेंड' या चित्रपटांत देखील दमदार भूमिका साकारली.
एकता कपूर त्याची प्रशंसा करताना म्हतले होते की विक्रांत हा बॉलीवूड मध्ये नक्कीच आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळवेल.
सध्या लॉक डाऊन असल्यामुळे तो आपला वाढदिवस आपल्या आईसोबत आणि पत्नी सोबत साजरा करणार आहे.