हैदराबादः आपल्या परोपकारी कार्यासाठी "परप्रांतीयांचे मसीहा" म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सोनू सूद यांनी येथील रामोजी फिल्मसिटीमध्ये रोपटे लावून ग्रीन इंडिया चॅलेंजमध्ये भाग घेतला.
दबंग अभिनेता सोनू सूदला चित्रपट दिग्दर्शक श्रीनू वैटला यांनी असे आव्हान दिले होते. ते सोनूने स्वीकारले आणि रोपटे लावून हे आव्हान पूर्ण केले.
राज्यसभेचे खासदार जोगिनापल्ली संतोष कुमार यांनी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना 47 वर्षीय अभिनेता सोनू म्हणाला की, कोविडनंतर पर्यावरण वाचवणे हीच प्राथमिकता आहे. प्रत्येक व्यक्तीने रोपे लावून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी भाग घ्यावा.
गेले काही महिने तो सामाजिककार्यात व्यग्र असताना, त्याला भूमिकेच्या अनेक ऑफर आल्या आणि विशेष म्हणजे, आता तो ज्या भूमिका साकारणार आहे त्या लार्जर दॅन लाइफ आहेत.
सोनू सद्या चित्रपट स्वीकारताना घाई करीत नाही. त्याने आपल्या निर्मात्यांना सांगितले आहे की, सामाजिक काम करण्यासाठी त्याला वेळ हवा आहे. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.
सोनूने यापूर्वी एका वृत्तवाहिनीला सांगितले होते की, “जेव्हा मी असे म्हणतो, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेवा. लोकांना मदत करण्यापासून मी ज्या प्रकारचे समाधान मिळवितो, ते समाधान १०० कोटींच्या चित्रपटाचा भाग होण्यापेक्षा मोठे आहे.''
सध्या तो दक्षिणेमध्ये दोन चित्रपटात काम करीत असून यशराज - पृथ्वीराज हा एक चित्रपट आहे. पुढील आठवड्यामध्ये याचे शूटींग सुरू होईल. सोनू सूद आता अधिक सहानुभूतीपूर्ण भूमिकांच्या शोधात आहे.